माझ्या हिश्श्याचे किस्से: दिग्दर्शक मोहनकुमार यांनी दिलेल्या भेटीमुळे बदलले राजेश खन्नांचे नशीब!

0
16
माझ्या हिश्श्याचे किस्से: दिग्दर्शक मोहनकुमार यांनी दिलेल्या भेटीमुळे बदलले राजेश खन्नांचे नशीब!


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Special Purvani Likhanan By Rumi Jaffrey On Rajesh Khanna Mohankumar

रूमी जाफरी3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

मोहनकुमार निर्मित आणि दिग्दर्शित ‘अवतार’ चित्रपटातील ‘दिन महिने साल गुज़रते जाएंगे’ या सुपरहिट गाण्याच्या एका दृश्यात राजेश खन्ना आणि शबाना आझमी. 

माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये मी आज दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक मोहनकुमार यांच्याविषयी सांगणार आहे. माेहनजींनी बनवलेल्या प्रत्येक चित्रपटाचे नाव “अ’पासून सुरू व्हायचे. ‘अमृत’, ‘अनपढ़’, “आस का पंछी’, “अवतार’, “अमीर गरीब’, ‘आई मिलन की बेला’, ‘अमन’, “आजमाइश’ असे ‘अ’पासून सुरू होणारे अनेक चित्रपट त्यांनी बनवले. मोहनकुमार आपल्या सर्व चित्रपटांचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती स्वत:च करायचे. ‘आस का पंछी’ हा त्यांचा पहिला चित्रपट खूप संस्मरणीय होता. त्याची कथाही खूप चांगली होती. मुलींच्या शिक्षणावर त्यांनी ‘अनपढ़’सारखा उत्कृष्ट चित्रपट बनवला.

१९८० मध्ये “आप तो ऐसे ना थे’ या चित्रपटानंतर त्यांनी विचार केला की, अमिताभ बच्चन यांना घेऊन चित्रपट का बनवू नये? अमिताभ त्या वेळी मोठे स्टार आणि प्रत्येक निर्माता, दिग्दर्शकाचे ‘ड्रीम हीरो’ होते. मोहनकुमार यांनी अमिताभ यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा मोहनजींची गणना चांगल्या आणि ख्यातनाम दिग्दर्शकांमध्ये होत होती. त्यामुळे अमितजींनीही होकार दिला. मोहनजींना खूप आनंद झाला. त्यांचा उत्साहही वाढला. त्यांनी चित्रपटाची तयारी सुरू केली, ‘अर्जुन’ हे त्याचे शीर्षकही निश्चित केले. पण, नंतर अशी काही परिस्थिती आली की, हा चित्रपट सुरू होण्यापूर्वीच बंद झाला.

मोहनजींनी मला त्याविषयी सांगितले होते. ते सांगत होते.. “एके दिवशी सकाळी मी घरात चिंतेत बसलो होतो. आता काय करावं हे कळत नव्हतं. मनात विचार येत होता. हे वर्षही असंच कामाशिवाय चाललंय. आठवडाभरात नवं वर्ष लागेल आणि पुढं तर काहीच दिसत नाही. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की, आज राजेश खन्नांचा वाढदिवस आहे. मी त्यांना फोन केला. म्हणालो, “काका, वाढदिवसाच्या शुभेच्छा! माझ्याकडं जेवायला या आणि तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्तानं एक सुंदर भेटवस्तूही द्यायचीय.’ राजेश खन्नांनी आमंत्रण स्वीकारलं आणि ते माझ्या घरी आले.

मोहनजी पुढे म्हणाले, ‘राजेश खन्ना यांच्यासाठीही ते दिवस फारसे चांगले नव्हते. “धरम काँटा’, “दर्द’, “िदल-ए-नादां’ यांसारखे त्यांचे बरेच चित्रपट फ्लॉप झाले होते. जेवण झाल्यावर ते म्हणाले, ‘मोहन भाई, ती भेटवस्तू तर द्या! मला जेवणापेक्षाही तिची जास्त उत्कंठा आहे.. त्यावर मी म्हणालो, माझ्याकडे एक कहाणी आहे, त्याचे शीर्षक आहे “अवतार’. तुम्ही मला तारखा द्या, मी तुम्हाला चित्रपट देतो..’ आणि असा सुरू झाला ‘अवतार’, जो पुढे एक सुपरहिट आणि संस्मरणीय चित्रपट ठरला.

मोहनजींना माझा सहवास खूप आवडायचा आणि मलाही त्यांच्याकडून खूप जुने किस्से ऐकायला मिळायचे, अनेक गोष्टीही शिकायला मिळायच्या. त्यामुळे बऱ्याचदा मी सकाळीच त्यांच्याकडे जायचो आणि आम्ही गप्पा मारत बसायचो. एके दिवशी सकाळी मोहनजींनी मला नाष्ट्यासाठी बोलावले. मी त्यांच्यासोबत नाष्टा करत होतो तेवढ्यात त्यांचा वॉचमॅन आला आणि म्हणाला की, कुणी साहेब तुम्हाला भेटायला आले आहेत. मोहनजी म्हणाले, ‘पाठव त्यांना.’

एक वयस्कर, अत्यंत देखण्या व्यक्तिमत्त्वाचे गृहस्थ आत आले. त्यांनी मोहनजींना नमस्कार केला आणि म्हणाले, ‘मी तुमच्या दर्शनासाठी आलोय.’ मोहनजी हसून म्हणाले, “लोकं माझे चित्रपट बघतात, कोणी मला बघायला येत नाही, मी असं काय केलं की तुम्ही माझं दर्शन घ्यायला आलात?’ ते गृहस्थ म्हणाले, “तुम्ही माझ्यासाठी संत आहात.’ मोहनजींनी विचारले, “कसं काय?’ तर ते म्हणाले, ‘तुम्ही “अवतार’ चित्रपट लिहिला आणि बनवला आहे, ज्याची कथा प्रत्येक कुटुंबाला प्रेरणा देणारी आहे. हा सिनेमा मी अनेकदा पाहिलाय. मी दरवर्षी वैष्णोदेवीला जातो. सोबत याच्या १०० व्हिडिओ कॅसेट नेतो आणि तिथं लोकांना वाटतो. “अवतार’ हे एक प्रवचन आहे. आपल्या समाजासाठी, कुटुंबासाठी त्यात मोठा धडा आहे. मुंबईला गेल्यावर तुमचं दर्शन नक्की घ्यायचं, असा मी नेहमी ठरवायचो. आता तुम्हाला भेटल्यावर मी जणू एका संताला भेटतोय असं वाटतंय’ मोहनजींनी त्यांना बसवले. चहापाणी विचारले.

मी स्वत:ला खूप नशीबवान समजतो की, मी अशा लोकांपैकी एक आहे, ज्यांनी मोहनजींसोबत काम केले आहे. त्यांनी बनवलेल्या “आजमाइश’ चित्रपटाचे संवाद मी लिहिले होते. यावरून मला जावेद अख्तर यांचा एक शेर आठवतोय…

जिधर जाते हैं सब जाना उधर अच्छा नहीं लगता
मुझे पामाल रस्तों का सफ़र अच्छा नहीं लगता

त्यानंतर एकदा मोहनजी मला म्हणाले, “एक दिवस जावेद अख्तर भेटायला आले होते. ते म्हणाले, “मोहनजी, मी तुमच्याकडं एक महत्त्वाचं काम घेऊन आलोय.’ मी म्हणालो, ‘बाेला भाई, काय काम आहे?’ ते म्हणाले, ‘हे असं काम आहे की तुम्ही माझ्याकडे या कामासाठी आला असता तर ते मी केलं नसतं. कारण मी तुमच्यासारखा चांगला आणि मोठ्या मनाचा माणूस नाही.’ मी हसून विचारले, ‘काय काम आहे?’ जावेद साहेब म्हणाले, ‘अर्जुन’ टायटल मला देऊन टाका. मी म्हणालो, ‘हो, हो. घेऊन टाका.’ जावेद साहेबांनी खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले, “यावर सही करा.’ आणि मी सही केली.’ माेहनजी मला म्हणाले, त्याच वेळी माझ्या लक्षात आले होते की, ‘अ’पासून सुरू होणारे टायटल मिळत नाही आणि हे इतके छान टायटल मी जावेद साहेबांना देतोय. पण, मला जावेद अख्तर यांची ते मागण्याची पद्धत इतकी आवडली की ते देण्याचा पश्चात्तापही झाला नाही. आज मोहनजी आणि राजेश खन्ना यांच्या आठवणीत ‘अवतार’मधील हे गाणे ऐका…
दिन महिने साल गुज़रते जाएँगे..
हम प्यार में जीते, प्यार में मारते जाएँगे…
स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.



Source link