माझ्या हिश्श्याचे किस्से: ओम पुरींना स्वत:ला लपवायचे होते, पण आपल्या आवाजामुळे पकडले गेले

0
18
माझ्या हिश्श्याचे किस्से: ओम पुरींना स्वत:ला लपवायचे होते, पण आपल्या आवाजामुळे पकडले गेले


रूमी जाफरी6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

दोन दिवसांपासून मला पुरी साहेब अर्थात ओम पुरी साहेबांची खूप आठवण येतेय. कारण काल, म्हणजे ६ जानेवारीला त्यांनी या जगाचा निरोप घेऊन सात वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये पुरी साहेबांविषयी…

पुरी साहेबांचा आवाज खूपच दमदार होता, हे सर्वांनाच माहीत आहे. आजचा किस्सा त्यांच्या अभिनयाशी नव्हे, तर याच आवाजाशी जोडलेला आहे. पण, त्याआधी पुरी साहेबांशी माझी पहिली भेट कशी झाली, ते सांगतो. पुरी साहेबांची आणि माझी ओळख अन्नूभाईंंच्या (अन्नू कपूर) घरी त्यांच्या भगिनी आणि ज्यांना मीसुद्धा बहीण मानतो, त्या सीमा कपूर यांनी करुन दिली. सीमाजींना सगळे गुड्डो म्हणायचे. मी त्यांना गुड्डो बाजी म्हणत असे. त्यावेळी पुरी साहेब आणि गुड्डो बाजींच्या लग्नाची बोलणी सुरू होती. त्या माझ्यावर लहान भावाप्रमाणे प्रेम करायच्या. मी त्या वेळी २०-२१ वर्षांचा असेन. गुड्डो बाजी आणि पुरी साहेबांचे लग्न, नंतर त्यांचे विभक्त होणेे, पुढे पुरी साहेबांना झालेला पश्चात्ताप या सगळ्या गोष्टी मी येथे नाही, माझ्या आत्मचरित्रात लिहीन.

असो. तर किस्सा असा : १८ डिसेंबर १९८९ ला मुंबईत माझे अपेंडिक्स बस्ट झाले. माझी तब्येत खूप गंभीर झाल्याने हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतो. मोठे ऑपरेशन झाले. ३१ डिसंेबरला नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला लोक नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घराबाहेर पडत होते आिण मी मला मिळालेल्या नव्या आयुष्याचा आनंद साजरा करण्यासाठी हॉस्पिटलमधून घरी निघालो होतो. खूप अशक्तपणा आला होता म्हणून आरामासाठी भोपाळला गेलो. तेथे गेल्यावर मला कावीळ झाली. ऑपरेशनमुळे अशक्त झालोच होतो, काविळीमुळे आणखी कमजोर झालो. मला भेटण्यासाठी मुंबईहून अन्नूृभाई आणि पुरी साहेब भोपाळला आले. दोघेही मला आणि माझ्या कुटुंबाला आपले कुटुंब मानायचे. दोघेही स्टार होते, पण हॉटेलऐवजी माझ्या घरीच थांबले.

काही दिवसांनी झालावाडमध्ये पुरी साहेब आणि गुड्डो बाजीचे लग्न होणार होते. ते माझ्या आईला आणि बहिणीला म्हणाले, ‘मला नवरीसाठी भोपाळच्या बेगमसारखेे कपडे शिवायचे आहेत.’ मी म्हणालो, “पुरी साहेब, तुम्ही स्टार आहात. तुमचे लग्न आहे. कोणत्याही मोठ्या डिझायनरला सांगा, तो शिवून देईल.’ त्यावर पुरी साहेब म्हणाले, ‘तसे केले तर ते फिल्मी होईल. मी बेगम घरी आणतोय ना, मग ती लग्नाच्या पोशाखातही बेगमच दिसायला पाहिजे.’ आई म्हणाली, ‘ठीक आहे, आम्ही शिवून पाठवतो.’ पुरी साहेब बोलले, ‘नाही, माझ्या सीमासाठी कापड, रंग आणि डिझाइन मी स्वत: पसंत करेन.’ मी सांगितले की, तुम्हाला पाहिजे तसे कापड जुन्या भोपाळमधल्या चौक मार्केटमध्ये मिळेल. पण, तिथं गर्दी खूप असते. तिथवर गाडी जाणेही अवघड आहे. तुम्ही पायी जाणार असाल, तर तुम्हाला पाहण्यासाठी गर्दी होऊन बराच गोंधळ उडेल.

पुरी साहेब म्हणाले, ‘तशीही भोपाळमध्ये खूप थंडी आहे. लोक, स्वेटर – कोट, मफलर घालून फिरताहेत. मग मी पण मंकी कॅप घालतो. त्यातून फक्त डोळे दिसतात. वरुन चष्मा घालतो आणि अंगावर शाल घेतो. इथं माझा चेहरा तुलाच दिसला नाही, तर मार्केटमध्ये कुणाला दिसणार?’ ही कल्पना सगळ्यांना आवडली. पुरी साहेबांनी मंकी कॅप घालून डोळ्यावर चष्मा लावला, अंगावर शाल ओढून घेतली. त्यांच्यासह मी, माझी बहीण, आई असे सगळे मार्केटमध्ये पोहोचलो. आम्ही एका दुकानात बसून कपडे बघत होतो, रंग – डिझाइनवर बोलत होतो. दुकानदार कपडे दाखवत होता आणि आम्ही, ‘हा रंग चांगला नाही, तो दाखवा.. यावरचे काम हलके आहे, भारीवाले दाखवा.. गोटा दाखवा..’ असं काही काही त्याला सांगत होतो. या बोलण्यात पुरी साहेबही सामील होते. दुकानाच्या कोपऱ्यात एक पांढरी दाढीवाले, टोपी आणि चष्मा घातलेले वयस्कर गृहस्थ बसले होते. बहुतेक ते दुकानदाराचे नातेवाईक असावेत. उर्दूतील कुठलं तरी वर्तमानपत्र वाचत होते. काही वेळ ते आमचं बोलणं ऐकत होते. आणि अचानक आमच्याकडे वळून म्हणाले, ‘जनाब.. तुम्ही ओम पुरी आहात ना?’ हे ऐकून आम्ही सगळेच चकित झालो. पुरी साहेबांनी त्यांच्याकडं पाहिलं आणि म्हणाले, “चाचा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, मी ओम पुरी नाही.’ त्यावर ते वयस्कर गृहस्थ म्हणाले, ‘हे बाेलून तुम्ही कन्फर्मच केलंत की तुम्ही ओम पुरीच आहात.’ ते पुढे म्हणाले, ‘मी सिनेमा वगैरे काही पाहात नाही. तरुणपणी दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर यांचे काही सिनेमे बघितले होते. पण, मी वर्तमानपत्रात वाचलंय तुमच्या ‘अर्धसत्य’ या सिनेमाने सगळीकडे खळबळ उडवून दिली आहे. त्याला कार्लाे व्हेरी पुरस्कार मिळालाय. आणि तुम्हालाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळालाय ना?’ या गृहस्थांना पुरी साहेबांबद्दल आणि त्यांच्या सिनेमांंबद्दल इतकं सगळं माहिती आहे, हे ऐकून मी पण अवाक‌ झालो. मग पुरी साहेबांनी आपला चष्मा, टोपी काढली आणि “तुम्ही महान आहात,’ असे म्हणत ते त्या गृहस्थाच्या पाया पडले. त्यावर ते गृहस्थ म्हणाले, ‘मला तुमचा तो सिनेमा इतका आवडला की तुमचा आवाज माझ्या कानामध्येच बसला. आणि तुमचे नाव ऐकून ‘मिर्च मसाला’ आणि ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’ हे दोन सिनेमेही बघितले.’

ओम पुरी साहेब केवळ दमदार अभिनयासाठीच नव्हे, तर त्यांच्या भारदस्त आवाजासाठीही ओळखले जात होते. त्यांच्या आवाजावरून मला आसी उल्दनी यांचा एक शेर आठवतोय… सब्र पर दिल को तो आमादा किया है लेकिन, होश उड़ जाते हैं अब भी तिरी आवाज़ के साथ। मला चांगलं आठवतंय की, कपडे खरेदी करुन रात्री घरी आल्यावर आम्ही टीव्हीवर बातम्या बघत बसलो होतो. त्याचवेळी पद्म पुरस्कारांच्या घोषणेची बातमी आली आणि पुरी साहेबांना ‘पद्मश्री’ जाहीर झाल्याचे ऐकताच आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. मग आमच्या घरी दुसऱ्याच दिवशी पुरी साहेबांना ‘पद्मश्री’ मिळाल्याबद्दल आणि माझी तब्येत बरी झाली म्हणून एक पार्टी ठेवण्यात आली. ती एक संस्मरणीय संध्याकाळ होती. त्यानंतर पुरी साहेब आणि अन्नभाई मुंबईला परतले. २८ फेब्रुवारी १९९० ला झालाबाड येथे पुरी साहेब आणि सीमा यांचे लग्न झाले. मी भोपाळहून थेट त्या लग्नाला गेलो होतो. पुरी साहेबांच्या स्मरणार्थ त्यांच्या चित्रपटातील हे गाणं ऐका…

सच्ची आज़ादी समझेगा उस दिन हिंदुस्तान, जिस दिन सबको मिल जायेगा रोटी कपड़ा और मकान। स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.

(लेखक बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक)



Source link