
Baby Care Tips: पूर्वी लहान मुलांच्या डोळ्यांत काजळ लावणे ही एक सामान्य आणि शुभ परंपरा मानली जात होती. काजळामुळे वाईट नजर लागत नाही, मुलं अधिक गोड दिसतात आणि नशीब चांगले राहते, अशी अनेकांची समजूत होती. पण काळ बदलला आहे. आज जे काजळ बाजारात मिळते, ते पूर्वीसारखे नैसर्गिक राहिलेले नाही. त्यामुळे ही परंपरा आता हळूहळू मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.
भारतभरातून अलीकडे काही धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत. काजळ लावल्यानंतर अनेक मुलांच्या डोळ्यांना जळजळ, सूज, लालसरपणा आणि संसर्ग झाल्याचे आढळून आले. या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून डॉक्टरांनीही गंभीर इशारा दिला आहे.
बाजारातील काजळ किती सुरक्षित आहे?
बालरोगतज्ज्ञांच्या मते, सध्या उपलब्ध असलेले बहुतांश काजळ शुद्ध नसते. त्यामध्ये रसायने, कार्बन, शिसे आणि इतर घातक घटक मिसळलेले असतात. हे घटक प्रौढांसाठीही हानिकारक ठरू शकतात, तर लहान मुलांच्या नाजूक डोळ्यांसाठी ते अधिक धोकादायक आहेत.
बालरोगतज्ज्ञांच्या सांगतात की नवजात मुलांना आणि लहान मुलांच्या डोळ्यांभोवतीची त्वचा अतिशय संवेदनशील असते. थोड्याशा रासायनिक संपर्कामुळेही मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कोणतीही खात्री नसलेले काजळ वापरणे टाळावे.
काजळामुळे होणाऱ्या आरोग्य समस्या
रासायनिक काजळामुळे डोळ्यांतून पाणी येणे, सतत डोळे चोळणे, खाज सुटणे, लालसरपणा आणि सूज येणे अशी लक्षणे दिसू शकतात. काही प्रकरणांमध्ये संसर्ग इतका वाढतो की डॉक्टरांचा उपचार आणि औषधांची गरज भासते.
दीर्घकाळ काजळ वापरल्यास डोळ्याच्या पटलावर परिणाम होऊन दृष्टी कमजोर होण्याचा धोका असतो. त्यामुळे डॉक्टर कोणत्याही प्रकारचे काजळ मुलांच्या डोळ्यांत लावण्याचा सल्ला देत नाहीत.
एक वर्षाखालील मुलांसाठी खास इशारा
डॉक्टरांच्या मते 1 वर्षाखालील मुलांच्या डोळ्यांत काजळ अजिबात लावू नये. फारच आवश्यक वाटल्यास बाजारातील काजळ पूर्णपणे टाळावे. काजळामुळे अॅलर्जी, जंतुसंसर्ग, पापण्यांवर गाठी येणे आणि डोळ्यांच्या नसांना सूज येण्याचा धोका असतो.
हे ही वाचाः जेवण शिजवताना ‘या’ चुका करणे टाळा, नाहीतर तुम्हीच तुमच्या मुलांचे आरोग्य धोक्यात आणाल!
डोळ्यांची स्वच्छता कशी ठेवावी?
डोळ्यांची स्वच्छता राखण्यासाठी फक्त स्वच्छ कपडा आणि उकळून थंड केलेले पाणी वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. डोळ्यांत लालसरपणा, सूज किंवा जळजळ दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. परंपरेपेक्षा विज्ञान महत्त्वाचे असून, मुलांच्या डोळ्यांशी कोणताही प्रयोग भविष्यात गंभीर परिणाम करू शकतो, असा इशाराही तज्ज्ञ देत आहेत.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)








