‘पुढारी’च्या दणक्यानंतर महामार्गाची दुरूस्ती | पुढारी

0
20









सातारा; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बेंगलोर महामार्गाची अवस्था दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते. याबाबत दै. ‘पुढारी’ने सलग दोन दिवस सडेतोड वृत्त प्रसिद्ध करताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खडबडून जागेे झाले. रविवारी सकाळी सकाळीच यंत्रणेने खड्डे मुजवण्याची मोहीम हाती घेतली. दरम्यान, ही दुरूस्ती तोंडदेखली न करता दर्जेदारपणे खड्डे मुजवण्याची मागणी होत आहे.

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात सुरुवातीपासूनच तक्रारींचा ओघ आहे. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची अर्धवट राहिलेली कामे, सेवा रस्त्यांची झालेली दुरवस्था यामुळे अपघात होऊन आजपर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. राष्ट्रीय महामार्ग सध्या जीवघेणा बनला आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांनी ‘आ’ वासला असून अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

खड्डे चुकवण्याच्या नादात दुर्घटना घडत आहेत. लिंबखिंड ते शेंद्रे या हद्दीत दोन्ही बाजूंच्या लेनवर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसाचे पाणी साठल्याने वाहन चालकाना अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात आदळाआपट होत आहे. प्रसंगी खोल खड्ड्यातून वाहने जाताना टायर फुटून अपघात घडले आहेत. ठिकठिकाणी रस्ता खचला असून मोठी चर पडल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे खड्डे अर्धा ते पाऊण फुटाचे खोल आहेत. महामार्गाच्या दूरवस्थेबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेवून दै.‘पुढारी’ने जोरदार आवाज उठवला. सलग दोन दिेवस याप्रश्नी सडेतोड वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे यंत्रणा जागी झाली. ‘पुढारी’च्या बातम्यांची दखल घेवून तातडीने खड्डे दुरूस्तीला सुरुवात करण्यात आली. रविवारी सातारा शहर परिसरातील महामार्गावर खड्डे दुरूस्ती मोहीम हाती घेण्यात आली.











Source link