
हल्ली अनेक महिलांना असे वाटू लागले आहे की नको असलेली गर्भधारणा थांबवण्यासाठी ओटीसी गोळ्या घेणे हा एक सोपा, सुरक्षित असा वैयक्तिक मार्ग आहे. ऑनलाइन सहज उपलब्धत, सोशल मीडियावरील अपुरी माहिती आणि सामाजाच्या भीतीमुळे अनेक महिला डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वमर्जीने औषधं घेतात. मात्र, हे भविष्यातील गर्भधारणेसाठी धोकादायक ठरू शकते.
गर्भपाताच्या गोळ्या हे सर्दी- खोकल्याच्या औषधाप्रमाणे सामान्य नाहीत. त्या घेण्याआधी योग्य वैद्यकीय तपासणी, गर्भधारणेचा अचूक कालावधी आणि योग्य डोस घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय किंवा चुकीच्या पद्धतीने गोळ्या घेतल्यास या गोळ्या अपेक्षेप्रमाणे काम करत नाहीत. अनेक वेळा अपूर्ण गर्भपात होतो, म्हणजेच गर्भाचे काही अवशेष गर्भाशयातच राहतात. यामुळे तीव्र रक्तस्राव, वेदना आणि संसर्ग होऊ शकतो आणि वेळीच उपचार न केल्यास जीवघेण्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात.
अनेक महिला दीर्घकाळ होणारा रक्तस्राव आणि वेदना “सामान्य” समजून दुर्लक्ष करतात आणि डॉक्टरांकडे जाण्यास टाळाटाळ करतात किंवा विलंबाने जातात. त्यामुळे अनेक रुग्ण गंभीर अॅनिमिया, संसर्ग किंवा अंतर्गत गुंतागुंतींसह रुग्णालयात दाखल होतात, जे योग्य वेळी उपचार घेऊन टाळता आले असते.
गर्भपाताच्या गोळ्यांचा शरीरावर होणारा परिणाम
अनेक महिला विचार न करता गर्भपाताच्या गोळ्या घेतात. डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय या गोळ्यांचा वापर केल्यास हार्मोन संतुलन बिघडू शकते आणि त्यानंतर ३ ते ४ महिने मासिक पाळी अनियमित राहू शकते. गर्भपाताच्या गोळ्या नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्याव्यात. जास्त रक्तस्रावामुळे अशक्तपणा येऊ शकतो, थकवा, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू शकतात आणि त्यासाठी तातडीने उपचारांची गरज भासू शकते.
गर्भाशयात गर्भाचे अवशेष राहिल्यामुळे होणारा संसर्ग पुढे गर्भाशय आणि आसपासच्या अवयवांपर्यंत पसरू शकतो. अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया किंवा दीर्घकालीन उपचारांची गरज भासू शकते, ज्यामुळे महिलांवर शारीरिक आणि मानसिक ताण येतो. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय या संपूर्ण प्रक्रियेतून जाताना अनेक महिलांना ताण, अपराधीपणा आणि नैराश्याचा सामना करावा लागतो.
भविष्यातील गर्भधारणेवर होतो परिणाम
वारंवार किंवा चुकीच्या पद्धतीने केलेल्या गर्भपातामुळे गर्भाशयाच्या आतील आवरणाला इजा होऊ शकते. यामुळे वंध्यत्व, वारंवार गर्भपात होणे किंवा भविष्यातील गर्भधारणेत गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका वाढतो. संसर्गामुळे गर्भाशय किंवा फॅलोपियन ट्युबमध्ये जखमा निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे भविष्यातील गर्भधारणेत अडचणी येतात. काही महिलांमध्ये गर्भाशयाबाहेरील गर्भधारणेचा (एक्टॉपिक प्रेग्नन्सी) धोका वाढतो, जी अत्यंत गंभीर आणि आपत्कालीन वैद्यकीय स्थिती आहे.
डॉक्टरांच्या देखरेखीखाली केलेला सुरक्षित गर्भपात आरोग्यासाठी धोकादायक ठरत नाही. गर्भपात पूर्ण झाला आहे का आणि शरीर नीट सावरत आहे का हे तपासण्यासाठी डॉक्टरांकडे फॉलोअप करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉक्टरांचा सल्ला न घेता ओटीसी गोळ्यांचा वापर करून गर्भपात करणे सोयीचे वाटू शकते, पण ते योग्य नाही. योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास महिलांचे आरोग्य सुरक्षित राहते आणि भविष्यातील प्रजनन आरोग्य सुरक्षित व निरोगी राखता येते.







