डायरीची पाने: खत, पत अन् एकमत इंद्रजित भालेराव

0
23
डायरीची पाने:  खत, पत अन् एकमत इंद्रजित भालेराव


6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘गावात पत, शेतात खत अन् घरात एकमत असेल, तर त्याच्या सुखाला पारावार नसतो,’ असं पूर्वी म्हटलं जायचं. सेंद्रिय शेतीमुळे आता तो काळ परत येईल, अशी आशा आहे.

उन्हाची तलखी वाढता वाढता वाढतच जाते आणि रोहिणी नक्षत्र सुरू होतं. रोहिणी नक्षत्रात वळवाचा पाऊस सुरू होतो. यालाच मान्सूनपूर्व पाऊस असंही म्हटलं जातं. रोहिणी हे मृगाआधीचं एक नक्षत्र. पण, ग्रामीण भागात या नक्षत्राला नुसतं ‘रोहिणी’ असं म्हणत नाहीत. त्यासाठी ‘रोहिण्या-भोईण्या’ असा जोडशब्द वापरला जातो. हे रोहिण्या-भोईण्या काय आहे, असं विचारलं तर आई सांगायची की, या मिरगाच्या बहिणी आहेत. त्या आधी येतात आणि जमीन गार करून जातात. नंतर मृग येतो आणि ओल आरपार करून जातो. मग जमीन बीजधारणेसाठी तयार होते आणि पेरणी सुरू करता येते. आई या सोबतच एक ओवी सुद्धा म्हणून दाखवायची…

पाऊस पडतो

मिरगाआधी रोहिणीचा

पाळणा हलतो

भावाआधी बहिणीचा…

ग्रामीण जीवनाच्या व्यवहारातला अनुभव नक्षत्रांना लावून ही ओवी तयार करण्यात आली आहे. बहीण धाकटी असली, तरी तिचा विवाह आधी केला जातो. आणि तिला मोठ्या भावाच्या आधी मुलंबाळं होतात. तिचा पाळणा हलतो. म्हणून या ओवीत भावाआधी बहिणीचा पाळणा हलतो, असं म्हटलं आहे. रोहिणी नक्षत्राचे दिवस म्हणजे शेतकऱ्यांसाठी उकिरड्यातला खत शेतात नेऊन टाकण्याचा काळ. या पंधरा-वीस दिवसांत गावातले आणि शेतातले सगळे उकिरडे उपसले जातात. उकिरड्यातला सगळा खत रानात नेऊन टाकला जातो. आधी त्याचे ढीग रानात जागोजागी टाकले जातात. मग खोऱ्याने ते विखुरले जातात. सगळं शिवार उन्हाळ्यात उलथून टाकलेलं असतं. रिकाम्या रानात दुसरी काय कामं असणार? अशावेळी मुद्दाम उकिरडे उपसण्याचं काम काढलं जातं. गावातल्या उकिरड्यात प्रामुख्यानं राख आणि घरातला कचरा असतो. त्याचं चांगलं खत तयार झालेलं असतं. शेतातल्या उकिरड्यात प्रामुख्यानं शेणखत असतं. या काळात जसे उकिरडे उपसले जातात, तसं पावसाळ्यात उकिरडे पाण्यानं भरून उलथू नयेत म्हणूनही ते उपसून याच काळात रिकामे केले जातात. दुसरं कारण म्हणजे, उकिरड्यातलं खत रानात नेऊन विखरून जमिनीत मिसळून टाकलं आणि त्यावर पाऊस पडला की ते जमिनीला भोगते. आधी नेऊन टाकलं आणि नुसतंच वाळून गेलं, तर ते तेवढं जमिनीत भोगत नाही. म्हणून याच काळात ते रानात नेऊन टाकलं जातं.

उकिरडे उपसणे हा एक कार्यक्रमच असतो. तिथं आधी बैलगाडी आणून उभी केली जाते. उकिरड्यातला खत टोपलीनं त्या गाडीत टाकला जातो. एक जण उकिरड्यात उतरून टोपली भरून देतो, दुसरा काठावर उभं राहून खत गाडीत भरतो. गाडीच्या साट्यातून खत ओघळू नये म्हणून चारी बाजूनं पोती लावली जातात. गावातल्या उकिरड्यात नव्हे, पण शेतातल्या उकिरड्यात शेणखातामुळं प्रचंड हुमण्या झालेल्या असतात. शेतात गांडूळ असतात तसे उकिरड्यात हुमण्या असतात. या हुमण्या शेण खाऊन त्याचं कसदार खत तयार करतात. या मोठमोठ्या हुमण्या म्हणजे एक प्रकारच्या अळ्याच असतात. त्या दिसायला तजेलदार, पांढऱ्या शुभ्र असतात. उकिरड्यातून निघणाऱ्या या हुमण्या शेतकरी खोऱ्याने बाजूला काढून टाकतात. त्या खाण्यासाठी उकिरड्याभोवती कावळ्यांची झुंबड उडते. रानात भिजवणी सुरू असताना जसजसे जमिनीत पाणी जाईल तसतसे त्यातले किडे-मकोडे बाहेर येतात. ते खाण्यासाठी रानात पाखरांची आणि प्रामुख्याने बगळ्यांची झुंबड उडते, तशी उकिरड्याभोवती कावळ्यांची दाटी होते.

ज्यांच्याकडे शेत नाही त्यांच्या घरी उकिरडा तर असतोच असतो. मग ते या उकिरड्याचं काय करतात? तर ज्यांच्या घरी शेत आहे, असे लोक हे उकिरडे विकत घेतात. त्यातून गोरगरिबांना थोडेफार पैसे मिळतात. शेतकऱ्यांना कसदार खत मिळतं. पूर्वी हे उकिरडे विकत घेण्याची जणू स्पर्धाच असे. लोक आधीच ईसार देऊन उकिरडे राखीव करून ठेवत. त्याचा भावही ठरवला जात असे. त्यामुळं मागास वस्तीतले उकिरडे प्रामुख्यानं शेतकऱ्यांना विकले जात आणि त्यातून थोडीफार मदत मिळवली जात असे. शेतकऱ्याच्या दृष्टीने हे खत म्हणजे फार महत्त्वाची गोष्ट असे. जुन्या काळात तर शेणखताला सोनखत समजलं जायचं. म्हणजे शेणाला सोनंच मानलं जात असे. कारण जेवढं जास्त शेणखत रानात टाकाल, तेवढं रान सोन्यासारखं पिकतं, याची खात्री या शेतकऱ्यांना असायची. त्यामुळं असे उकिरडे विकत घेण्याची स्पर्धा शेतकऱ्यांमध्ये लागलेली असायची. अर्थात, हे उकिरडे रोख पैशाने विकत घेतले न घेता, त्यासाठी ज्वारी दिली जात असे. उकिरडे पाहून, त्याचा आकार पाहून तो विकत घेतला जायचा. किंवा गाडीवरूनही खताचं मोल ठरायचं. उकिरडा गुत्त्याने घेतला जात असे किंवा जितक्या गाड्या निघतील, तितक्या पायल्या धान्य उकिरड्याच्या मालकाला दिलं जात असे.

काही शेतकरी या शेणखतावर फारच जीव टाकत. आमच्या गावात एक प्रतिष्ठित गृहस्थ होते. पण, शेण दिसलं की त्यांना मोह आवरायचा नाही. मग ते धोतराच्या सोग्यात किंवा उपरण्यातही शेण भरून घरी घेऊन येत. चक्रधर स्वामींनी त्यांच्या दृष्टांतांमध्ये सेनपुंजीचा एक सुंदर दृष्टांत सांगितला आहे. शेण गोळा करणाऱ्या मुली या दृष्टांतात येतात. शेणावर त्या मुलींचं लक्ष कसं असतं, दोन मुलींनी एकाच वेळी पाहिलेला शेणाचा पोहटा कुणी घ्यायचा, याच्याही काही पद्धती असत. जिनं आधी पाहिला तिनं किंवा जी धावत जाऊन आधी घेईल तिनं, असे काही नियम ठरवले जात. तेव्हा शेतकऱ्यांसाठी खत ही गोष्ट फारच महत्त्वाची होती. आणि त्या खतांमुळं शेतीही फार चांगली पिकायची. त्यातून कसदार धान्य जन्माला यायचं. पुढं आपल्या देशाची भूक भागवण्यासाठी संकरित वाणं आणावी लागली. संकरित खतं आणावी लागली. या संकरित खतांमुळं भसाभसा पिकणारं शेत पाहून या शेणखताचं / सोनखताचं, उकिरड्याचं महत्त्व फारसं कुणाला राहिलं नाही. पण, आज पुन्हा आपण संकरित शेतीकडून सेंद्रिय शेतीकडं वळतो आहोत. त्यामुळं पुन्हा एकदा शेणाला, उकिरड्याला महत्त्व येईल, असं वाटतं. पूर्वी कुणाची समाजातली पत – प्रतिष्ठा मोजायची असेल, तर त्यासाठी काही निकष होते. त्यात एक निकष खत हाही होता. त्या संदर्भातलं एक वाक्य प्रचलित होतं.. ‘गावात पत, शेतात खत अन् घरात एकमत असंल, तर त्याच्या सुखाला पारावार नसतो.’ आता यातलं काहीही नसलं तरी माणसं सुखी होऊ शकतात, असा विपरीत काळ आला आहे. सेंद्रिय शेतीमुळं तो पुन्हा पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

(संपर्कः inbhalerao@gmail.com)



Source link