ठरलेल्या मुहूर्ताआधीच Monsoon केरळात धडकणार; महाराष्ट्रातही यंदा मोठा मुक्काम? कुठवर पोहोचले मोसमी वारे?

0
6
ठरलेल्या मुहूर्ताआधीच Monsoon केरळात धडकणार; महाराष्ट्रातही यंदा मोठा मुक्काम? कुठवर पोहोचले मोसमी वारे?


Monsoon Updates : यंदाच्या वर्षीचा उकाडा अधिक त्रासदायक असणार असा प्राथमिक इशारा या वर्षाच्या सुरुवातीलाच हवामान विभागानं जारी केला. तसं झालंसुद्धा मात्र, मे महिना या अंदाजासाठी अपवाद ठरलाय सहसा प्रचंड उकाड्याचा मारा करणाऱ्या या महिन्यानं यावेळी एक वेगळंच रुप दाखवलं. राज्यासह देशभरात मे महिन्यात चक्क जोरदार पावसानं हजेरी लावली. महाराष्ट्रात सुरुवातीला अवकाळी आणि आता मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्यामुळं थेट मे वगळून जूनमध्येच पोहोचलो की काय, असाच अनेकांचा समजही होत आहे. त्यातच आता हा समज अधिकच पक्का होण्याचं कारण म्हणजे मान्सूनचं मुहूर्ताआधीच झालेलं आगमन. 

अंदमान आणि निकोबार बेट समुहांमध्ये काही दिवसांपूर्वीच धडकलेल्या मान्सूननं पुढील रोखानं प्रवास सुरू केला आणि श्रीलंका व्यापल्यानंतर आता हे मोसमी वारे अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराचा काही भागसुद्धा व्यापताना दिसत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार 27 मे आधीच म्हणजेच पुढील 4 दिवसांमध्ये (25 मे 2025) मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. 

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळं या वाऱ्यांचा प्रवास अतिशयव वेगानं सुरू असून, यंदा वेळेाधीच या आनंदसरी देवभूमी केरळात आणि परिणामी महाराष्ट्रातही दाखल होण्याचं चित्र आहे. 

मान्सूनच्या पुढील चार ते पाच दिवसांच्या वेळापत्रकाविषयी सांगावं तर, हे वारे अरबी समुद्राच्या दक्षिण भागासह लक्षद्वीपचा काही भाग, केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागासह मालदीव आणि कोमोरिनचा उत्तरेकडी प्रांत व्यापतील आणि तिथं आपली पकड मजबूत करतील अशी स्थिती निर्माण होत आहे. मंगळवारी मान्सूनच्या वाऱ्याचा वेग काहीसा मंदावला मात्र त्याआधी त्यानं मारलेली मजल मोठी होती ही बाब लक्ष देण्याजोगी. 

मान्सूननं मारलेली ही मुसंडी पाहता 25 ते 27 जूनदरम्यान ते केरळात धडकतील आणि तिथंलं क्षेत्र व्यापल्यानंतर 1 ते 5 जूनदरम्यान हा मान्सून तळकोकणमार्गे महाराष्ट्राचं दार ठोठावणार हे चित्र स्पष्ट आहे . 

हवामान विभागाच्या नव्या अंदाजांनुसार खरंच मान्सूननं चार पाच दिवसांत केरळ गाठलं तर, 2009 नंतर म्हणजेच 16 वर्षांमध्ये मुहूर्ताआधीच दाखल होण्याची ही मोसमी वाऱ्यांची पहिली वेळ असेल. त्यामुळं आता याच मोसमी वाऱ्यांच्याच प्रतीक्षेत सर्वजण आहेत म्हणायला हरकत नाही. 

सामान्य प्रणाली पाहिली असला मोसमी पाऊस साधारण जून महिन्याच्या सुरुवातीलाच केरळात दाखल होतो. मात्र यावेळी तो तुलनेनं वेळेआधीच पोहोचणार असून, महाराष्ट्रातील त्याचा मुक्काम मोठा असू शकतो असाही प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. 





Source link