जंगलबुक : फुलपाखरं, निसर्ग आणि बरंच काही

0
5
जंगलबुक : फुलपाखरं, निसर्ग आणि बरंच काही



अगदी तरुण वयात मोठमोठ्या परीक्षांमध्ये यशस्वीरित्या उत्तीर्ण व्हायचं आणि प्राध्यापक म्हणून सुरुवात करत निसर्गप्रेमात रमायचं… असं अजब समीकरण फार कमी वेळा पाहायला मिळतं. बऱ्याचदा राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा दिल्याच जातात मुळी… मोठ्या पगाराची नोकरी मिळावी म्हणून… हर्षल कुडू या तरुणाने मात्र आपली गोष्ट बदलली. त्याने मोठमोठ्या परीक्षांमध्ये यश संपादन केलं आणि पुढे निसर्गाच्या प्रेमात पडल्यावर थेट संशोधनाकडे आपली वाट वळवली.

लहान गाव, साधं कुटुंब, मर्यादित साधनं… पण स्वप्न मात्र मोठी. हार न मानणाऱ्या जिद्दीने आणि न थकणाऱ्या मेहनतीने वाडा तालुक्यातील हर्षल कुडू याने शैक्षणिक जगतात सुवर्णपदक जिंकलं, राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमध्ये यश मिळवलं आणि अवघ्या पंचविसाव्या वर्षी प्राध्यापक होण्याचं स्वप्न साकार केलं. आज हर्षल पुंडलिक कुडू हा केवळ प्राध्यापक नाही, तर निसर्गाचा अभ्यास करणारा संशोधक आणि संवर्धनाची जबाबदारी अंगीकारलेला कार्यकर्ता आहे. फुलपाखरं, जंगल आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यातच तो जगण्याचा आणि शिकवण्याचा आनंद शोधतो.

अकरावीत असतानाच हर्षलने ठरवलं शिक्षक व्हायचं. डॉक्टर, इंजिनीअर होण्याच्या शर्यतीत न पडता, त्याने वडील पुंडलिक माधवराव कुडू यांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्ञान देण्याचा मार्ग निवडला. ‘शिक्षण हीच खरी सेवा’ हा धडा त्याला घरातूनच मिळाला आहे. झूलॉजीत बी.एस्सी. पूर्ण केल्यानंतर त्याने एम.एस्सी. (ॲनिमल फिजिओलॉजी) या विषयात केलं आणि १० सीजीपीएसह पदवी संपादन केली. २०२३ मध्ये तो मुंबई विद्यापीठाचा गोल्ड मेडलिस्ट ठरला. त्यानंतर २०२४ मध्ये पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र सेट, मुंबई विद्यापीठ पीईटी, आयसीएमआर-जेआरएफ आणि सर्वात प्रतिष्ठित सीएसआयआर – नेट जेआरएफ या चार परीक्षा उत्तीर्ण केल्या. सीएसआयआर – नेटमध्ये त्याला अखिल भारतीय ८० वा क्रमांक मिळाला. हर्षल केवळ पुस्तकात अडकलेला विद्यार्थी नव्हता. महाविद्यालयीन काळातच त्याने जंगल, नदीकाठ, किनारपट्टी अशा ठिकाणी सर्वेक्षण केले. जैवविविधतेचा अभ्यास, फुलपाखरांची नोंद, पक्षी नोंद याच बरोबर प्रयोगशाळेतील अनुभव घेत त्याने आपला पाया अधिक भक्कम केला.

आज हर्षल स्वत: सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथे झूलॉजीचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवण्यात मनापासून रमला आहे. त्याची शिकवण्याची पद्धत संवादात्मक आणि आकर्षक असल्याने विद्यार्थी त्याच्याकडे शिकणं मनापासून पसंत करतात. ‘द नेचर्स आय’ या संस्थेमार्फत तो निसर्गविषयक कार्यशाळा, अभ्यासक्रम व फील्ड ट्रेल्स घेतो. २०२५ मध्ये त्याची ‘बिग बटरफ्लाय मंथ’ या आशियातील सर्वात मोठ्या फुलपाखरांच्या उपक्रमासाठी पालघर जिल्हा समन्वयक म्हणून निवड झाली. त्याने ग्रीन लाईन मुंबई, बीएनएचएस, वाइल्डटेल्स फाउंडेशन, जीवाय ४ ईएस अशा संस्थांसोबतही काम केलं आहे. जीवशास्त्रासोबत हर्षलने बायोइन्फॉर्मेटिक्स, फॉरेन्सिक सायन्स, मायक्रोबायोलॉजी, डेटा ॲनालिसिस यांसारख्या विविध क्षेत्रात ज्ञान मिळवलं आहे. आधुनिक साधनं जसे की जीआयएस, मॉलिक्युलर डॉकिंग, जीनोम एडिटिंग वापरून संशोधन करण्याची त्याची तयारी आहे. पुढे वन्यजीवशास्त्रात पीएच.डी. करून डॉ. हर्षल कुडू अशी ओळख मिळवण्याचं त्याचं स्वप्न आहे. २५व्या वर्षी प्राध्यापक बनलेला हा तरुण आज विद्यार्थ्यांसाठी केवळ शिक्षक नाही, तर प्रेरणा बनला आहे. स्वतःबद्दल सांगताना हर्षल म्हणतो,

‘मी फक्त प्राध्यापक नाही, मी आयुष्यभर शिकणारा विद्यार्थी आहे. निसर्गच माझं सर्व काही आहे आणि विद्यार्थी हीच माझी खरी ताकद आहे’. सतत शिकत राहण्याचा त्याचा ध्यास आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात झोकून देऊन काम करण्याची त्याची जिद्द खरोखरच तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे.



Source link