गोष्ट सांगतो ऐका…: लाइट कधी जाणारंय?

0
31
गोष्ट सांगतो ऐका…:  लाइट कधी जाणारंय?


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Special Coloum By Aevind Jagtap | Goshta Sangato Aika By Arvind Jagtap | When Will The Lights Go Out?

अरविंद जगताप6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

ताईच्या घरी लोकांचे पाच – पन्नास तरी अर्ज पडलेले असतात. कॉलनीतले लोक आता बाहेरच्यांचीही कामं आणतात. ताई कुठल्या कामावर चर्चा करत नाही. फक्त अर्ज घेते.

सगळी कॉलनी तिला ताई म्हणते. तिचा नवरा प्रताप इन्शुरन्स एजंट आहे. प्रताप जवळ येताना दिसला की लोक उठून जातात. पण, ताईला मान आहे. कॉलनीत सगळ्यात जास्त चर्चा असते ती ताईची. कुणी मुलाच्या कॉलेज प्रवेशासाठी, कुणी नोकरीसाठी, कुणी कर्जासाठी ताईला विनंती करत असतो. खूपदा लाइट कधी जाणार, हे पण काही लोक ताईला विचारतात. अशा वेळी ताईला राग येतो. अर्थात येणारंच. लाइट गेल्यावर विचारणं ठीकय, पण लाइट कधी जाणार, हा काही प्रश्न आहे का? आणि लाइटविषयी प्रश्न विद्युत मंडळाला विचारला पाहिजे.

पण, लोक ताईला विचारतात. ताईचा स्वभाव पण रोखठोक आहे. काम होणार असेल तर ती ‘हो” म्हणते. नसेल तर स्पष्ट ‘नाही’ म्हणते. तुम्हाला वाटत असेल ताई आमदार वगैरे आहे. पण, तसं काही नाही. ताई राजकारणापासून चार हात लांब आहे. तिशीत आहे, पण तिनं आजवर एकदाही मतदान केलेलं नाही. एवढी ती राजकारणापासून दूर आहे. सामाजिक काम मात्र ती मन लावून करते. म्हणजे फक्त कॉलनीपुरतं. म्हणजे कॉलनीत काही कार्यक्रम असेल तर ताई भरपूर वर्गणी देते. भंडारा असेल तर दोन पोते तरी तांदूळ देते. मुलांच्या क्रिकेट सामन्यांना बक्षीस देते. म्हणून तरुण पोरं ताईला मान देतात.

ताई खानदानी श्रीमंत आहे असं तुम्हाला वाटत असेल. पण, ताईचे आई-वडील छोटं किराणा दुकान चालवतात. ताईचा नवरा दारोदार हिंडतो तरी लोक त्याच्याकडून विमा काही काढून घेत नाहीत. तरीही ताई समाजासाठी खूप काही करत असते. आणि आजवर आयकर खात्याने तिला कधीही विचारलं नाही की तुम्ही पैसे कुठून आणता? आयकर खातं विचारणार तरी कसं? कारण ताईने आजवर एकदाही आयकर भरलेला नाही. कदाचित तुम्हाला ताई कुणी ज्योतिषी किंवा बुवा वगैरे वाटत असेल. पण, तसं काही नाही. ताईचा ज्योतिषशास्त्राचाशी लांब लांब संबंध नाही. अर्थात, ‘या आठवड्यात पाणी येणार का?’ वगैरे प्रश्न लोक ताईला विचारतात. आणि ताई बहुतांश वेळा अचूक उत्तर देते. पण, म्हणून तिला भविष्य कळतं असं नाही. तिला माणसं मात्र कळतात. पण, ताईचा आणि अध्यात्म वगैरेचाही काही संबंध नाही.

आपण भले आणि आपलं काम भलं. कधी कुणाच्या वाटेला जायचं नाही. सहसा घराबाहेर पडायचं नाही. ताई कधी कुठल्या कार्यक्रमात स्टेजवर पण येत नाही. त्यामुळं लोकांना एक विशेष कौतुक आहे. आजवर ताईने एवढ्या कार्यक्रमाला देणग्या दिल्या, पण कधी कुठल्या स्टेजवर आली नाही. मंदिराच्या फरशा नवीन बसवून दिल्या. लोक म्हणाले, एका संगमरवरी फरशीवर ताईचं नाव टाकू. पण, ताईनं स्पष्ट नकार दिला. ताई कधी श्रेय घेत नाही. अशी माणसं आजच्या युगात आहेत याचंच आपल्याला आश्चर्य वाटतं.

ताईच्या घरी लोकांचे पाच-पन्नास तरी अर्ज पडलेले असतात. कॉलनीतले लोक आता बाहेरच्या लोकांची पण कामं घेऊन येतात. ताई कुठल्या कामावर चर्चा करत बसत नाही. फक्त अर्ज घेते. एखादी म्हातारी बाई असेल किंवा कुणी खूपच गरीब किंवा अशिक्षित असेल तर ताई त्यांचं ऐकून घेते. त्या पलीकडं ताई कुणाला भेटतही नाही. ताई दिवसभर काय करते, असा खूप लोकांना प्रश्न पडतो. पण, ताईला दिवसभर वेळच नसतो. मग दिवसभर ती काय करते? तर दिवसभर रील्स बघते.

चार वर्षांपूर्वी एकदा ताईला जरा अस्वस्थ वाटू लागलं. शहरातले सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ ऑपरेशन अर्धवट टाकून ताईच्या घरी धावत आले. तपासणी केली. त्यात ताईचं ब्लडप्रेशर किंचित वाढल्याचं लक्षात आलं. तेव्हापासून ताई रील्स बघते. सकाळी झोपमोड झाली तर ताई नऊला उठते. मग उठल्यापासून रील्स सुरू होतात. कधी रील्समध्ये हसण्याचे आवाज. कधी ताईच्या हसण्याचा आवाज. ताईच्या घरी स्वयंपाक एक नंबर असतो. कारण ताई स्वयंपाक बनवत नाही. एक बाई बनवते. ताई जेवणाची वेळ कधीच चुकवत नाही. ताईला घरातली प्रत्येक गोष्ट जागेवर पाहिजे असते. आणि त्याची काळजी दुसरी एक बाई घेते.

ताई स्वतः एकच गोष्ट करते, ती म्हणजे मेकअप. दिवसातला एक – दीड तास ताईला मेकअपसाठी लागतो. महिना महिना घरातून बाहेर न पडणारी ताई कुठल्याही क्षणी आता कुठल्या तरी समारंभाला निघणार आहे अशा तयारीत असते. मन आणि घर प्रसन्न असलं पाहिजे हा ताईचा कटाक्ष असतो. आणि हे सगळ्या कॉलनीला माहीत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, लोकांना ताईच्या एवढ्या गोष्टी कशा माहीत? तर हे सगळं ताईकडं सुरक्षेसाठी असलेला पोलिस सांगत असतो.

सुरक्षेसाठी पोलिस? आता मात्र अति झालं. हो ना? पण, हे खरं आहे. जिवाला धोका असल्यामुळं ताईच्या घराबाहेर कायम एक पोलिस असतो. खरं तर दोन वर्षांपूर्वी एका माणसानं ताईच्या नवऱ्याला विचारलं, ‘लाइट कधी जाणारंय?’ आता हा फालतू प्रश्न ऐकून त्याला राग येणं स्वाभाविक आहे. सगळी जनता ‘लाइट कधी येणार?’ या प्रश्नाचा विचार करते. ‘लाइट कधी जाणारंय?’ हा काय प्रश्न आहे? ताईच्या नवऱ्यानं संतापून त्या माणसाच्या थोबाडीत मारली. त्या माणसालाही राग आला. त्यानंही दिली उलटी ठेवून. प्रकरण वाढलं. चार लोक जमा झाले. सगळ्यांनी मिळून त्या माणसाला मारलं. त्याच दिवशी सुरक्षा मिळाली.

खरं तर नवऱ्याला सुरक्षा द्यायची. पण, नवरा विमा घ्या म्हणून सतत दारोदार फिरतो. त्याच्या मागे पोलिस कुठं फिरणार? म्हणून मग पोलिस ताईच्या घराबाहेर बसून असतो. आत ताई रील बघत असतात. बाहेर पोलिस रील बघत असतो. आता तुम्हाला हे जरा जास्तच होतंय असं वाटत असेल. पण, आजच ताईला एक फोन आलाय. त्यानं फोनवर विचारलं, ‘लाइट कधी जाणारंय?’ ताई म्हणाली, ‘रात्री दहा वाजता.’ त्या माणसानं रात्री लोकांना घरी जेवायला बोलावलं होतं. ते आता रद्द केलंय. हे ताईमुळं शक्य झालं.

पण, ताईला हे कसं शक्य झालं? कारण पालकमंत्री दहा वाजता ताईकडं येणार आहेत. ते अधूनमधून येत असतात. खासगी गाडीत. तरी कॉलनीत चर्चा होते. म्हणून त्यांच्या यायच्या वेळी कॉलनीतली लाइट घालवली जाते. पालकमंत्री अधूनमधून ताईकडं खासगी भेटीसाठी येतात. याची कुणी तक्रार करत नाही. फक्त त्यांची काय चर्चा होते माहीत नाही. पण, पालकमंत्री चोरून का होईना यानिमित्ताने मतदारसंघात येतात हेही लोकांना बरं वाटतं. लोक आपल्या कामाचे अर्ज ताईकडं आधीच देऊन ठेवतात. फक्त अधूनमधून एकच प्रश्न विचारतात, ‘लाइट कधी जाणारंय?’ तेवढी एकच गैरसोय होते लोकांची. बाकी सगळं बरं चाललंय.

(संपर्क- jarvindas30@gmail.com)



Source link