गोष्ट सांगतो ऐका…: अंधारातला दिवस…

0
15
गोष्ट सांगतो ऐका…:  अंधारातला दिवस…


अरविंद जगताप8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अतुल म्हणाला, ‘हाच यायला पाहिजे!’ योगेश म्हणाला, ‘तोच यायला पाहिजे!’ वाद वाढत गेला. अतुलने हात उचलला. जोरदार आवाज झाला. आणि एका क्षणात दोघे गप्प झाले.

शहराचा मुख्य चौक आहे. तिथं एक भला मोठा फोटो आहे नेत्याचा. तेजसदादा त्याचं नाव. त्याची सावली खाली असलेल्या चहावाल्याला दिवसातला काही वेळ सुखावणारी असते. चहा घेणारे लोक येत-जात असतात. तेजसदादाकडं बघतात. कुणी तिकडं बघत सिगारेटचा धूर सोडतो. कुणी हलकेच हसतो. आता अतुल आणि योगेश चहा घेत होते. दोघांची ओळख या चहावाल्यापाशीच झाली. दोघेही कामाच्या शोधात आहेत. अतुलकडं कार होती. मुंबई – पुणे ट्रीप मिळायच्या. चांगला पैसा मिळायचा. पण, लॉकडाऊनमध्ये त्याची कार बँकेच्या लोकांनी उचलून नेली. योगेशने लॉकडाऊनमध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय केला. चांगला चालत होता. मग मोठा गाळा भाड्याने घेऊन एक टेम्पो विकत घेतला. पण, लॉकडाऊननंतर व्यवसाय एकदम थंड झाला.

योगेशला कळायला मार्ग नव्हता की, लॉकडाऊनमध्ये भाजीपाला घेणारे गेले कुठं? दोघं आहे त्या कर्जातून बाहेर निघण्यासाठी वेगवेगळ्या वाटा शोधत होते. पण, फक्त व्याज वाढत होतं. अशातच दोघांची ओळख झाली. शेअर बाजाराचा नाद लागला. मार्केटवर चर्चा करत दोघे चहावाल्यापाशी तासन् तास बसून असतात. दोघांच्या मोबाइलमध्ये मार्केटचा ग्राफ वर-खाली होत असतो; पण त्यांच्या आयुष्यात पैशाचा ग्राफ काही वर जायला तयार नव्हता. चहावाला त्यांना बघून मनातल्या मनात हसायचा. हसणारंच. टाटाचं काय होणार? अंबानीची कशी वाट लागणार? अशा गप्पा मारणारे हे दोन फाटके लोक बघून कुणालाही हसू येणार. पण, हसू आलं तरी त्याचं गिऱ्हाईक होतं. दोघं स्वभावानं चांगले होते. फक्त निवडणुका आल्यापासून दोघांमध्ये भांडण वाढलं होतं. रोज वाद होऊ लागले होते.

आजही अतुलने तेजसदादाचा भलामोठा फोटो पाहिला. नाराजीने म्हणाला, ‘काय केलं या खासदारानं? नुसती शोबाजी. काही कामाचा नाही..’ योगेशला राग आला. खरं तर योगेश तेजसदादाचा चाहता. त्याला तेजसदादाबद्दल एकही शब्द वाकडा बोललेला आवडत नाही. तेजसदादाचा पक्ष तो योगेशचा पक्ष. आणि तेजसदादाच्या विरोधातला पक्ष अतुलला आवडणारा. आपल्याला आवडणारा पक्ष सत्तेत आला की आपले ग्रह बदलणार, यावर दोघांचा ठाम विश्वास. दोघंही एकमेकांच्या पक्षातले दोष काढत चहा घेत बसायचे. मार्केट कुठल्या कुठं जायचं. कधी खाली, कधी वर. पण, दोघं तिथंच असायचे रोज. चहावाल्याकडं. घरी बसून मार्केट बघता यायचं नाही. घरच्यांची इच्छा होती की, दोघांनी काही तरी काम करावं. अतुलची बायको एका बालवाडीत शिकवायला जायची. योगेशचं लग्नच झालेलं नव्हतं. खरं तर जमत नव्हतं.

योगेशला वाटायचं की, आपल्या मनासारखं सरकार आल्यावरच लग्न जमेल. लग्न न जमण्याच कारण पण हे सरकार आहे, असं त्याला वाटायचं. एकूण, त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचं खापर ते आपल्याला न आवडणाऱ्या पक्षावर फोडायचे. जोरजोरात भांडायचे. पुन्हा कधी भेटणार नाही म्हणून निघून जायचे. पण, पुन्हा दुसऱ्या दिवशी चहावाल्याकडं भेटायचे.

आजही अतुलने तेजसदादाचा फोटो पाहिला. नेहमीप्रमाणं नाराजीनं. तेजसदादाच्या भल्यामोठ्या फोटोची सावली आता कुठं त्या चहावाल्याच्या गाडीच्या दिशेने पसरत होती. तेजसदादा निवडून येईल, असं योगेशला वाटत होतं. अतुलला तेजसदादा पडणार, याची खात्री होती. दोघांच्याही मनात पैज लावावी, असं यायचं. पण, पैज लावण्यासाठी पैसे? दोघांनी गेल्या चार-पाच वर्षांत एवढं काही गमावलं होतं की, आता त्यांना काही गमवायचं नव्हतं. मार्केटमध्ये पण दोघे पैसे लावत नव्हते. संधी शोधत होते. दोघांकडं मिळून पाच हजार होते. ते मार्केट नावाच्या बकासुराला काय पुरणार? दोघं अभ्यास करत राहायचे. हा शेअर वर जातोय, निफ्टी खाली जातोय, बँक निफ्टी पडतोय.. त्यात ग्राफचे पॅटर्न बघायचे. मागं एका मोठ्या कंपनीचे शेअर पडले, तेव्हा झालेलं नुकसान अजून भरून निघालं नव्हतं. त्यामुळं कुठं पैसे लावायची हिंमत होत नव्हती. सल्ले खूप मिळायचे, पण पैसे कुठूनच मिळत नव्हते. त्यात मार्केटबद्दल बोलून कंटाळा यायचा.

विषय आपोआप राजकारणाकडं यायचा. पण, आज जरा हद्द झाली. आजूबाजूचे लोक त्यांचं भांडण ऐकून गोळा झाले. मार्केटवरून विषय तेजसदादावर आला. त्याच्या पक्षामुळं नुकसान होतंय, असं अतुल म्हणाला. योगेशने ते खोडून काढलं. आधी हे नेहमीसारखं चालू राहिलं. पण, अचानक योगेशने शिवी दिली. मग दोघांकडून शिव्यांचा वर्षाव सुरू झाला. अतुल म्हणाला, ‘हाच यायला पाहिजे!’ योगेश म्हणाला, ‘तोच यायला पाहिजे!’ वाद वाढत गेला. अतुलने हात उचलला. जोरदार आवाज झाला. आणि एका क्षणात दोघे गप्प झाले.

योगेश अतुलकडं बघत राहिला. डोळ्यासमोर अंधार झाला होता. असं होईल, याची दोघांनाही कल्पना नव्हती. आयुष्यात एवढ्या वाईट गोष्टीना तोंड दिलं होतं दोघांनी; पण या गोष्टीची कल्पना केली नव्हती. खूप वेळा कर्जामुळं जीव द्यायचा विचार आला होता मनात. पण, सावरले होते. खूप वेळा अपमान झाला होता. पण, विसरले होते. आता जे झालं होतं, ते मात्र अनपेक्षित होतं. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. नेमकं काय झालंय? कशामुळं झालंय? याचा विचार करत राहिले. आता मुका मार लागलाय, हे लक्षात आलं होतं. कारण वेदना सुरू झाल्या होत्या. दोघांना. कारण तो आवाज झापडीचा नव्हता. तेजसदादाचा फोटो असलेलं ते भलं मोठं होर्डिंग पडलं होतं. वीस – पंचवीस लोक त्या होर्डिंगखाली अडकले होते. विव्हळण्याचे असंख्य आवाज त्यांच्या कानावर पडत होते. धूळ हळूहळू खाली बसत होती. एव्हाना ती नाकातोंडात गेली होती. पण, अंधार एवढा होता की दोघांनाही एकमेकांचे चेहरे दिसत नव्हते. भरदिवसा रात्र झाल्यासारखं वाटत होतं. बाहेर लोक मदत करण्यासाठी आरडाओरडा करत होते. पण, लोकांना उचलता येईल, असं होर्डिंग नव्हतं ते. खूप वेळ झाला. आता बाहेरून येणारे लोकांचे आवाज येईनासे झाले. दोघांनी आणखी हालचाल केली. सुटका होण्यासाठी. पण, समोर एक बाइक होती. त्याचा चालक थंडगार पडलेला होता. काहीच प्रतिसाद देत नव्हता. दोघांचा धीर खचला.

एका डेडबॉडी शेजारी दोन तास दोघं तसेच शांत पडून राहिले. आता मार्केटबद्दल बोलायची इच्छा नव्हती. राजकारणावर बोलायचा उत्साह नव्हता. अर्थात बाहेरून येणारे तुरळक आवाज मदतीपेक्षा अमक्या पक्षाला किंवा तमक्या पक्षाला दोष देणारेच होते. खरं तर आता गरज मदतीची होती. राजकारण्यांची नव्हती. योगेश आणि अतुलची इच्छा झाली की, या लोकांना ओरडून सांगावं.. ते कुणी येणार नाहीत.. आता फक्त मदत करणारा पाहिजे. पहिल्यांदाच दोघांच एकमत झालं होतं.. या अंधारातून बाहेर पडण्यासाठी एक तर आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील किंवा लोकांना. आपल्या उरावर पडलेलं अवाढव्य राजकारण काढून टाकल्याशिवाय प्रकाश दिसणार नाही. मोकळा श्वास घेता येणार नाही. दोघांनी एकमेकांचा हात घट्ट धरला. तेवढंच एक बरं वाटलं त्यांना. त्या अंधारातल्या दिवशी मित्र सोबत असणं एवढाच आशेचा किरण होता.

(संपर्कः jarvindas30@gmail.com)



Source link