खलनिग्रहणाय: सायबर गुन्ह्यांचा विळखा…

0
15
खलनिग्रहणाय:  सायबर गुन्ह्यांचा विळखा…


डॉ. भूषणकुमार उपाध्याय5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

दररोज हजारोंच्या संख्येने सायबर गुन्हे घडत आहेत. अनेक लोक अज्ञानपोटी आणि बदनामीच्या भीतीने तक्रार देत नाहीत. ज्या तक्रारी दाखल होतात, त्यातही हे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण समाधानकारक नाही. त्यामुळे हे गुन्हे रोखण्यासाठी पोलिस यंत्रणेच्या सक्रियतेसोबत नागरिकांची सतर्कताही महत्त्वाची आहे.

अलीकडेच माझ्या ओळखीतील एका गृहस्थांना फोन आला की, त्यांच्याविरुद्ध ईडीकडे मनी लाउंड्रिंगचा गुन्हा दाखल झालाय, वॉरंटही निघालंय आणि चार दिवसांत त्यांना आणि बायकोला अटक होऊ शकते. या संदर्भात काही बोलायचे असेल, तर लगेच अमुक नंबरवर व्हिडिओ कॉल करा. या गृहस्थांनी ताबडतोड व्हिडिओ कॉल केला, तर त्यांना पोलिस स्टेशन दिसले. एक रुबाबदार आयपीएस ऑफिसर समोर आला आणि त्याने आधी अर्वाच्च भाषेत त्यांना धमाकी दिली. मग त्यांच्या नावाने निघालेले अटक वॉरंटही दाखवले. या गृहस्थांनी रडतच विनंती केली की, साहेब काही तरी मार्ग काढा. यावर त्या कथित अधिकाऱ्याने एका बँक अकाउंटमध्ये ताबडतोड पन्नास लाख रुपये टाकायला सांगितले. ही रक्कम देण्यासाठी त्यांनी दोन दिवसांची वेळ मागितली. वेळ देताना कथित अधिकाऱ्याने सांगितले की, या गुन्ह्याशी राष्ट्रीय सुरक्षेचा संबंध आहे, म्हणून याविषयी कुठेही वाच्यात करू नका. तुमच्या पूर्ण परिवारावर आमची निगराणी आहे.

हे गृहस्थ व्यवसायाने डॉक्टर असून, खूप श्रीमंत आहेत. या प्रकारामुळे ते घाबरून गेले. त्यांनी संबंधित खात्यावर रक्कम पाठवायची व्यवस्थाही केली, तेव्हा त्यांची पत्नी त्यांना म्हणाली की, उपाध्याय साहेब तुमच्या ओळखीचे आहेत. किमान एकदा त्यांच्यांशी बोलून तरी घ्या.. मग इच्छा नसताना त्यांनी मला फोन केला आणि झालेला प्रकार सांगितला. ते ऐकत असतानाच, हे सायबर गुन्हेगारांचे कृत्य असल्याचं माझ्या लक्षात आलं. मी त्याचवेळी त्यांना सांगितलं की, अजिबात घाबरू नका. हा सगळा सायबर फसवणुकीचा प्रकार आहे. तुम्हाला कॉल आलेला तो नंबर लगेच ब्लॉक करा आणि सायबर पोर्टलवर, १९३० वर झालेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती द्या. त्यांनी त्याप्रमाणे केलं आणि सायबर फसवणुकीची एक घटना होता होता वाचली.

तथापि, अशा प्रकारचे गुन्हे दररोज हजारोंच्या संख्येने घडत आहेत. अनेक लोक अज्ञानपोटी आणि बदनामीच्या भीतीने पोलिसांकडे तक्रार देत नाहीत. सायबर फसवणुकीच्या ज्या तक्रारी दाखल होतात, त्यातही हे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण समाधानकारक नाही. ज्या बँक खात्यांमध्ये अशा रकमा जातात, ती खाती माहीत असतात. फोन नंबर असतो, इंटरनेटचा प्रोटोकॉल माहीत असतो, तरीही गुन्हेगार सापडत नाहीत. त्यामुळे या बाबतीत पोलिसांच्या तपास यंत्रणेला अधिक बळकट आणि सक्रिय करावे लागेल.

सायबर गुन्ह्यांची मोडस ऑपरेंडी नेहमी बदलत असते. सुरूवातीला सायबर गुन्हेगारांकडून असा फोन कॉल यायचा की, मी बँक अधिकारी बोलतो आहे, तुमचे केवायसी अपडेट नाही, त्यामुळे अमुक लिंकवर जाऊन सगळी माहिती भरा. अनेकदा हे लोक भूलथाप देऊन सगळी माहिती विचारुन घ्यायचे आणि बँक खात्यातून रक्कम गायब करायचे. हा प्रकार बऱ्याच लोकांना माहीत झाला. मग सायबर गुन्हेगारांनी मोडस ऑपरेंडी बदलली. आपण महावितरणमधून बोलतोय, तुमचे विजेचे कनेक्शन ८ वाजता कट होणार आहे आणि हे टाळायचे असेल, तर तमुक अकाउंटमध्ये एवढी रक्कम भरा, असे ते सांगू लागले. आता त्यांची मजल पोलिस क्राइम ब्रँचचा अधिकारी, ईडीचा अधिकारी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचा अधिकारी म्हणून कॉल करुन फसवण्यापर्यंत गेली आहे. तुमच्या आधारकार्डचा वापर करून पासपोर्ट किंवा ड्रग्ज पाठवण्यात आले आहे, तुमच्या मोबाइलचा वापर करून गुन्हे झाले आहेत, अशी बतावणी करुन हे लोक समोरच्याला लाखो रुपयांना फसवतात.

अनेकदा प्रसिद्ध व्यक्तीचे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करुन त्यांच्या फ्रेंडलिस्टमधील लोकांकडून आर्थिक मदतीच्या रुपाने पैसे उकळण्याचे प्रकार केले जातात. तुमच्या मुलाने गुन्हा केला आहे आणि तो आमचा ताब्यात आहे, असेही कॉल येतात. हे खरे वाटण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करुन हुबेहूब आवाज काढला जातो, व्हिडिओही तयार केला जातो.

दुसरीकडे, सेक्सटॉर्शनचे प्रकारही खूप वाढले आहेत. यामध्ये एखाद्या मुलीचा कॉल येतो. आधी ती समोरच्या व्यक्तीला आपल्या मोहपाशात ओढते. मग व्हिडिओ कॉल करुन त्याचे अश्लील स्थितीत चित्रण केले जाते. नंतर ते व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देऊन रक्कम मागितली जाते. अनेकदा ब्लॅकमेल करण्यासाठी मॉर्फ केलेले व्हिडिओ किंवा फोटोही पाठवले जातात. हे सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्षम आणि अधिक सक्रिय तर केलीच पाहिजे. त्याचबरोबर नागरिकांनीही याबाबतीत अत्यंत सजग असले पाहिजे. सायबर फसवणूक टाळण्यासाठी…

ही खबरदारी अवश्य घ्या

1. कोणताही संशयास्पद कॉल आला तर अजिबात घाबरू नका.

2. असा कॉल आल्यास त्याबाबत आधी घरातील सर्वांना नीट माहिती द्या.

3. अज्ञात व्हीडिओ कॉल घेऊ नका, चुकून घेतला गेल्यास लगेच डिसकनेक्ट करा.

4. अशा कॉलनंतर तत्काळ सायबर किंवा स्थानिक पोलिस स्टेशनला त्याची माहिती द्या.

5. नॅशनल सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवा किंवा 1930 वर कॉल करून तपशील द्या.

6. आपल्या परिचयातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना संपर्क करून माहिती द्या.

7. कोणत्याही स्थितीत कुठलाही ओटीपी, पिन किंवा पासवर्ड कोणाला देऊ नका.

8. अपरिचित व्यक्तीला किंवा बँक खात्यावर रक्कम ट्रान्सफर करु नका.

हे सदैव लक्षात असू द्या

1. पोलिस, क्राइम ब्रँच, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो, सीबीआय, ईडी आदी यंत्रणा कधीही व्हिडिओ कॉल करायला सांगत नाहीत.

2. कोणताही सरकारी विभाग पैसे भरण्यासाठी अकाउंट नंबर देत नाही. त्या विभागाच्या साइटवर जाऊन किंवा त्यांच्या अधिकृत पेमेंट गेटवेद्वारेच रकमेचा भरणा केला जातो.

3. तुम्ही कमावलेले पैसे तुमच्या मेहनतीचे आहेत. ते कुणा अज्ञात व्यक्तीकडे पाठवताना दहादा विचार करा.

4. पैसे चुकून पैसे ट्रान्सफर झाल्यास लगेच बँकेला कळवा. 24 तासांच्या आत कळवल्यास अनेकदा बँक ते परत करते.

(संपर्कः bhushankumarupadhyay@gmail.com)



Source link