किडनी फेल, डायबिटीस… अन् 172 आजारांना निमंत्रण; कमी झोपेमुळं होतंय शरीराचं ‘इतकं’ नुकसान?

0
2
किडनी फेल, डायबिटीस… अन् 172 आजारांना निमंत्रण; कमी झोपेमुळं होतंय शरीराचं ‘इतकं’ नुकसान?


Impact of incomplete sleep on health : जागतिक स्तरावरच सध्या सर्व क्षेत्रांमध्ये स्पर्धा इतकी वाढली आहे, की स्वत:च्या खाण्यापिण्यापासून ते अगदी व्यायाम, शारीरिक सुदृढता याकडे लक्ष देण्याचासुद्धा वेळ अनेकांना मिळत नाही. घरापासून दूर राहणाऱ्या मंडळींना बऱ्याचदा बाहेरच्या जेवणावर अवलंबून राहावं लागतं. या साऱ्यात भरीस भर म्हणजे लक्ष विचलित करणाऱ्या घटना, हातातील मोबाईल फोन आणि त्यावरचं सर्फिंग. 

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्रत्येक मानवी कृतीचा परिणाम हा त्या त्या व्यक्तीच्या शरीरावर होत असून, हळुहळू याच काही सवयी घात करू लागतात. जाणून धक्का बसेल, मात्र अपूर्ण झोपसुद्धा आजारपणांना निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरते. ज्यामुळं हृदयरोग, किडनी फेल या आणि अशा कैक गंभीर आजारांचा शरीराला धोका असतो. ‘हेल्थ डेटा सायन्स’ या नियतकालिकामध्ये यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून, एका संशोधनाच्या आधारे हे संदर्भ आणि काही चिंता वाढवणारी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

भीती वाढली, कमी झोपेमुळं 172 आजारांचा धोका? 

झोपेचं सरासरी प्रमाण आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम या धर्तीवर करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार गाढ झोपेत असतानाही मध्येच जाग येणं, सतत झोपेच्या वेळा बदलत राहणं अशा सवयींचा थेट संबंध पार्किन्सन्स, टाईप 2 डायबिटीस, किडनी फेल, अशक्तपणा, गँगरिन अशा 172 आजारांशी जोडला गेला आहे. अपुऱ्या झोपेमुळं हे आजार होण्याचा धोका दुपटीनं बळावण्याचा धोका वाढतो असं या अहवालात सांगण्यात आलं आहे. 

किती तासांची झोप आवश्यक? 

सुदृढ आरोग्यासाठी साधारण 7 ते 9 तासांची झोप आवश्यकच आहे. मात्र सोबतच चांगली आणि आरोग्यदायी जीवनशैली, आरोग्यास पूरक अशा सवयी या साऱ्याचा परिणामही झोप आणि आजारपणाच्या या समीकरणावर परिणाम करताना दिसतो. प्रत्येक व्यक्तीनुरूप झोपेच्या वेळी, झोपेचं प्रमाण विभिन्न असून, या साऱ्यामध्ये सवयींचं सातत्य, झोपेच्या निर्धारित वेळा आणि सरकतेशेवटी पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची असल्याची बाब या अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे. 





Source link