कबीररंग: ज्यों की त्यों धर दीनी चदरिया…

0
16
कबीररंग:  ज्यों की त्यों धर दीनी चदरिया…


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Article Coloumn Kabirrang By Hemkiran Patki | Keep Your Underwear As It Is…

हेमकिरण पत्की2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अवघ्या सृष्टीतील जीवमात्रांमध्ये मनुष्यजन्माचा लाभ ही निश्चितच निराळी बाब आहे. मनुष्यमात्राला लाभलेला जिवाकार, त्याची चेतना आणि संवेदना इतर जीवांहून वेगळे आहे. निसर्गतः असलेलं हे वेगळेपण खरंच आपल्या अनुभवात येतं का? की आपण त्याचं केवळ वरवरचं आकलन करून घेतो? आपण स्वतःला जाणून घेऊ शकतो म्हणजे आपल्या असण्याचा मूळ अर्थ जाणू शकतो, तसेच आपण या विश्वाला जाणिवेत घेऊ शकतो. ही सृष्टी, सर्व चराचर, काल, ऋतू आणि आत-बाहेरून आपल्याला व्यापणारे आकाश आपण संवेदनशीलतेनं जाणू शकतो. केवळ देहभाव असता तर आपली जाणीव, संवेदना एवढी विकसनशील असती का? याचा आपण अंतर्मुख होऊन विचार करतो का?

कबीरांनी विश्वाच्या स्वामींकडून लाभलेल्या या जीवभावाचा खूप तळमळीनं वेध घेतला आहे. लाभलेला जन्म ही त्यांची कृपा आहे. या कृपेला आपण अहोभावानं जाणून घ्यायला हवं. लाभलेल्या चेतनेचं, संवेदनेचं अणूभरही विकृतीकरण होऊ नये, त्याची अस्तित्वगत शुद्धता आहे तशी राहावी, यासाठीच तर जन्म घेणं आहे. कबीर याची सार्थ जाणीव आपल्याला करून देतात… झीनी झीनी बीनी चदरिया, काहे का ताना काहे कै भरनी, कौन तार से बीनी चदरिया।

जन्मानं विणकर असल्यानं कबीरांच्या पदांत, दोह्यांत विणकामाची प्रतीकं येतात. ही प्रतीकं जीवनातली आहेत. जगण्यातली तथ्ये आणि सत्य प्रकट करण्यासाठी ती खूप सक्षम आहेत. कबीर म्हणतात, स्वामींनी जीविताची चादर किती सूक्ष्म कलाकुसरीनं विणली आहे! त्याचा पट आपण जितक्या सूक्ष्म दृष्टीनं निरखू तेवढी चादर नीट जतन करता येईल. हीच कबीरांची आध्यात्मिक धारणा आहे. जीविताची चादर दिसते; पण त्याचा विणकर दिसत नाही, हा या स्वामींनी काळजीपूर्वक विणलेल्या चादरीचा विशेष आहे. एखाद्या हाताचा स्पर्श आपल्याला होतो, तेव्हा तो आपल्या हृदयालाही होतो, असा या स्वामींच्या घरच्या चादरीचा ताणा-बाणा आहे…

इंगला-पिंगला ताना भरनी, सुसमन तार से बीनी चदरिया।

एक कामभावाचं आणि दुसरं परमात्मभावाचं अशी दोन केंद्रं माणसात कार्यशील आहेत. त्यालाच योगाच्या परिभाषेत मूलाधार आणि सहस्राधार म्हटलं आहे. या दोन्हीला जोडणारी ऊर्जेची धार आहे, ती म्हणजे सुषुम्ना. आपण जितकं अवधानासह जगू तितकी ऊर्जा ऊर्ध्वगामी होते. ती प्रेम आणि करुणेत रूपांतरित होते. तसे तर स्थूलमानाने देहाचे ताणे- बाणे दिसत नाहीत आणि सूक्ष्मपणे पाहावं, तर ऊर्जेचा प्रवाह जाणिवेत येत नाही. याचा विस्मय कबीरांनी या ओळींतून व्यक्त केला आहे. जीविताच्या चादरीचं विणकाम त्यांना कमालीचं कलाकुसरीचं वाटतं…

आंठ कँवल, दस चरखा डोले, पाच तत्तगुन तीनी चदरिया। साईं को सियत मास दस लागै, ठोक ठोक के बीनी चदरिया।।

माणसाच्या देहातल्या ऊर्जाक्षेत्राची आठ कमळं आहेत, म्हणजे आठ चक्रं आहेत. इंद्रियांची दहा दारं आहेत. पंचमहाभूतांची पाच तत्त्वं आहेत. तीन गुणांनी देहभाव निर्माण झाला आहे. या सगळ्या देहातील घटकांचा मेळ आपल्यातला ऊर्जाप्रवाह ऊर्ध्वगामी व्हावा यासाठीच आहे. तो ऊर्ध्वगामी होणं म्हणजे आपली चेतना उंचावणं, संवेदना व्यापक होणं आहे. आपल्या असण्याच्या मूलार्थास जोडून घेणंच आहे. स्वामींना माणसाच्या जीविताचा पट विणण्यास दहा महिन्यांचा कालावधी लागतो. कबीर सुचवताहेत की, स्वामींनी एवढ्या सहेतुकतेनं बनवलेलं हे माणसाचं जीवित निष्काळजीपणात, अनवधानात व्यतित होऊ नये…

सो चादर सुर – नर – मुनि ओढिन, ओढिके मैली कीनी चदरिया। दास कबीर जतन से ओढि, ज्यों की त्यों धर दीनी चदरिया।।

कबीर या पदात एक महत्त्वाचं सूचन करताहेत आणि ते ध्यानात घेण्यासारखं आहे. सुर, नर आणि मुनी ही तीन प्रतीकं त्यांनी निवडलीत. स्वर्गातल्या देवतांनी, सामान्य माणसांनी आणि त्यागीजनांनी, ही जीविताची चादर जन्माला येताना जशी लाभली तशीच स्वामींकडं परत केली नाही. इंद्रियसुखाची इच्छा काय किंवा मोक्षप्राप्तीची इच्छा काय, दोन्हीही कामनाच आहेत. भोगाची, त्यागाची कामना जीविताची चादर कशी निर्मळ ठेवील? कबीर म्हणतात, या दासाने मात्र ही चादर खूप आस्थेनं, अवधानासह आणि प्रेमपूर्वक ओढली आहे. स्वामींनी जन्माला घालताना जशी दिली होती, तशीच ती आता त्याला परत केली आहे. कबीरांची ही मुक्तावस्था आहे. स्वामींकडून लाभलेली जीविताची चादर किंचितही विकृत होऊ न देता जशीच्या तशी त्याला परत करणं, हेच खरं मुक्त होणं आहे. हाच आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी निरामय जीवनाचा आदर्श आहे.

(संपर्क- hemkiranpatki@gmail.com)



Source link