कबीररंग: कबीर झूठ न बोलीये जब लग पार बसाय…

0
14
कबीररंग:  कबीर झूठ न बोलीये जब लग पार बसाय…


हेमकिरण पत्की11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आपल्या अवतीभवती रोज कितीतरी सुख-दुःखाच्या घटना घडत असतात. त्याची वार्ता आपल्या कानांवर येते. कधी वृत्तपत्रातून त्या घटनेविषयी वाचायला मिळते, तर कधी कोणी परिचित त्या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आपल्याला सहज भेटतो. त्या घटनेमागचं तथ्य सांगतो. आपल्याला सारी माहिती कळूनही घटनेतील तथ्य उलगडत नाही. मतमतांचा गलबला आपल्या मनात फक्त भरून राहतो. आपल्या अवतीभवतीच्या एका साध्या घटनेची ही हकीकत तर दृष्टीआडच्या सृष्टीची खेच आपल्या ध्यानात कशी यावी? अज्ञाताचा बोध आपल्याला कसा व्हावा? रोजच्या जगण्यातील घटना- प्रसंगांच्या आपल्या खोट्या धारणा, चुकीच्या समजुती, मनानं निर्माण केलेले भ्रांतीमय जग यांसोबतच आपण काळ कंठत असतो.

सत्याचं दर्शन ही आपल्यासाठी एक कल्पना असते; भावस्थिती नसते. भ्रमाचं शेवाळ सवळलं की सत्य सहज हाती येतं, याचा खराखुरा बोध कबीर आपल्या मनाला देतात. साध्या-सोप्या, पण मार्मिक दाखल्यांतून ते या सत्याचं दर्शन घडवतात…

सांचै कोइ न पतीयई

झूठै जग पतियाय।

पांच टका की धोपटी

सात टकै बिक जाय।।

माणसांनी निर्माण केलेल्या या जगातल्या कुणालाही जे आहे ते जाणवतं का? त्यातलं खरेपण मानवतं का? काय खरं असतं? दिसतं ते की असतं ते? माणूस जे दिसतं त्यावर किती पटकन विश्वास ठेवतो. ते त्याला खरं वाटतं. पण, जे दिसतं ते स्थितीशील नसतं, बदलणारं असतं. मग जे असतं ते काय असतं? तेच खरं का असतं? याविषयी या दोह्यातून एका मार्मिक दाखल्याच्या आधारानं कबीर सांगतात : या जगाच्या बाजारात पाच रुपयांचे धोतर सात रुपयांना विकले जाते. सुमारे सहाशे वर्षांपूर्वीची गोष्ट कबीर सांगताहेत. हा दाखला त्या काळचा आहे. तरीही त्याचं महत्त्व कमी होत नाही. धोतराची मूळ किंमत ग्राहकाला कळत नाही.

व्यवहारातील वस्तूविषयी तो नुसता उदासीन नसतो, तर खोटेपणाचं ज्ञान त्याला नसतं. एवढंच नाही, तर डोळे झाकून तो धोतराच्या किमतीवर विश्वास ठेवतो. गरजेच्या साध्या वस्तूंविषयीचं खोटेपण त्याला खोटेपण वाटत नाही. यातून सामान्य मनाची संस्कारबद्धता कबीर निर्देशित करतात. जे खोटं आहे ते मुळात नाहीच, ती आपल्याच मनाची भ्रांती आहे, हे उमजणं ही किती महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या आयुष्यात! ही जागरूकता वाढीस लागावी, यासाठीच तर कबीर आपल्या दोह्यातून पुढं सांगतात…

सांच बराबर तप

नहीं झूठ बराबर पाप।

जाके हिरदे सांच है

ताके हिरदे आप।।

आपल्या रोजच्या जगण्याच्या अनुभवातून आपल्यावर खऱ्या-खोट्याचा संस्कार होत असतो. अगदी साधं उदाहरण घेतलं तर ध्यानात येईल. अंधाराला स्वतःचं अस्तित्त्व आहे का? पण, तो आपल्या दृष्टीला जाणवतो. या जाणवण्यामुळं आपल्याला तो खरा वाटतो. एक छोटासा दिवा तेवत ठेवायचा अवकाश अंधार नाहीसा होतो. अंतरीच्या ज्ञानदिव्याच्या उजेडात आपली अखंड वाटचाल करत राहणं हे सत्याचरण आहे. हीच जीवनसाधना आहे. खऱ्या-खोट्याच्या द्वंद्वात आपण अडकतो. बोलणं आणि करणं यातील अंतर आपल्याला दुसऱ्या व्यक्तीच्या आधाराशिवाय जाणवत नाही. मन आणि मुख एक होत नाही. आपण आपलीच प्रतारणा करत राहतो; आपल्यालाच फसवत राहतो. खोटं उमजत गेल्यावर जे हृदयात असतं तेच खरं असतं, सत्य असतं. कबीर म्हणतात, हे सत्यच पुण्य असतं. म्हणजे अंतिमतः श्रेयस्कर असतं आणि आपलं खोट्या, आभासी जगात हरवणं म्हणजे पाप असतं. कारण तेच सत्याच्या दर्शनातला अडसर असतं.

ज्याच्या चित्ताची स्थिती खऱ्या-खोट्याच्या भेदापलीकडं जाऊन स्वच्छ पाहू शकते, त्यालाच या सत्याचं दर्शन घडतं. त्या चित्तातच ईश्वराचा वास असतो. आपल्या मनाची अशी स्थिती आहे का, याचा ज्यानं त्यानं धांडोळा घ्यावा.

कबीर झूठ न बोलीये

जब लग पार बसाय।

न जाने क्या होयगा

पल के चौथे भाय।।

आपण खोटेपणाचा आसरा कधीच करायचा नाही. अगदी क्षणभरही खोटं बोलायचं नाही. कारण तो एक क्षण सत्यदर्शनापासून आपल्याला दूर ठेवतो. कबीर म्हणतात, आपल्या जीविताचा काय भरवसा? या खोटेपणाचा आसरा घेतलेल्या क्षणातच प्राण गमावला तर मग सद्गती कुठली? इतकं हे जगणं बेभरवशाचं आहे. कबीरांच्या सांगण्याचं सार एवढंच की, मन माया आहे आणि आपलं निखळ असतेपण सत्य आहे. त्याचा बोध होणं हीच एकमेव हृदयात जपून ठेवण्याची गोष्ट आहे, अन्य काहीच नाही. कबीरांचं हे सांगणं नुसतं आदर्शाच्या पातळीवर न ठेवता आचरायला काय हरकत आहे?

(संपर्कः hemkiranpatki@gmail.com)



Source link