
Mahakumbh Mela Prayagraj : 144 वर्षांनंतर भारतातील संगमनगरी प्रयागराज इथं भरलेल्या कुंभमेळ्याची नुकतीच सांगता झाली. देशविदेशातून आणि विविध क्षेत्रातून असंख्य भाविकांनी, सानथोरांनी या महापर्वात सहभागी होत गंगास्थानाचा अनुभव घेतला. एकिकडे या महाकुंभमेळ्यात भक्तिचा जनसागर लोटलेला असतानाच दुसरीकडे अनेक कुटुंबांना याच ठिकाणी आर्थिक सुबत्ता पाहण्याची संधी मिळाली. या न त्या व्यवसायानं अनेकांचेच खिसे भरले. यामध्ये मोठ्या कंपन्यांपासून अगदी इथं दातून विकणाऱ्यांचाही फायदा झाला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीसुद्धा नुकतीच या महाकुंभमेळ्याशी संबंधित एक अशी माहिती दिली, जी ऐकून अनेकांच्याच भुवया उंचावल्या. योगींच्या मते यंदाच्या वर्षी महाकुंभमेळ्यात एका व्यक्तीनं तब्बल 30 कोटी रुपयांची कमाई केली. याचविषयी विधानसभेत देण्यात आलेल्या माहितीनुसार या नाविकाच्या कुटुंबाकडे एकूण 130 नौका होत्या.
45 दिवसांच्या या पर्वादरम्यान याच नौकांच्या माध्यमातून भाविकांना सेवा देत या कुटुंबानं तब्बल 30 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमवला. सरासरी एका नौकेमुळं या व्यक्तीच्या कुटुंबाला 23 लाखांचा नफा झाला, तर दिवसाला सरासरी हा नफा होता साधारण 50 ते 52 हजार रुपये.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उल्लेख केलेली ही व्यक्ती प्रयागराजमधील नैनी क्षेत्रातील अरैल भागातील निवासी असून, त्यांचं संपूर्ण कुटुंब याच व्यवसायात सक्रिय आहे. पिंचू महरा असं त्यांचं नाव असून, महाकुंभमधून झालेल्या कमाईमुळं त्यांचा आनंद गगनात मावत नाही अशीच प्रतिक्रिया दिली. आपण इतका पैसा कधी पाहिलाच नाहीय, अशाच शब्दांत हे कुटुंब त्यांच्या कमाईचं वर्णन करत आहे. यंदाच्या कुंभमेळ्यात भाविकांच्या संख्येत वाढ होण्यास त्यांनी योगी सरकारनं केलेल्या व्यवस्था आणि प्रयत्न कारणीभूत असल्याचं म्हणत हे त्यांचं श्रेय असल्याचं म्हटलं आहे.







