
फलटण | स्थानिक राजकारणाला नवा कलाटणी देणारी घटना आज फलटण शहरात घडली आहे. नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आणि प्रभाग क्रमांक २ चे लोकप्रिय तरुण नेते सनी (भैय्या) अहिवळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. आमदार सचिन पाटील आणि सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले की, “फलटण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दमदार कामकाज करीत आहे. येणाऱ्या काळात सनी अहिवळे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक २ मधील विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू.”
त्याचवेळी श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी सांगितले की, “संपूर्ण फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी आम्ही अजित पवार आणि आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. सनी (भैय्या) यांच्या रूपाने राष्ट्रवादीला शहरात एक खंबीर युवा नेतृत्व मिळाले असून त्यांचा यथोचित सन्मान राखण्याचे काम राष्ट्रवादी नक्की करेल.”
दरम्यान, युवा नेते सनी अहिवळे यांच्या या ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पक्षप्रवेशामुळे फलटण शहरातील राजे गटाला मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे. या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक २ मधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आगामी काळात सनी अहिवळे यांच्या नेतृत्वामुळे राजे गटातील संभाव्य गळती कोण रोखणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.








