
फलटण (प्रतिनिधी) : फलटण तालुक्यातील मेखळी गावातील बेपत्ता झालेल्या बहिण-भावाच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ७ एप्रिल रोजी अचानक बेपत्ता झालेल्या काजल काकासो चोपडे आणि किरण काकासो चोपडे यांचे मृतदेह ९ एप्रिल रोजी निरा उजव्या कालव्यात गुरसाळे हद्दीत आढळून आले.
दोघेही फलटण येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधून घरी परतत असताना अचानक गायब झाले होते. त्यांच्या शोधासाठी कुटुंबीय, नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले होते. मात्र, तिसऱ्या दिवशी त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणात नेमके काय घडले याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा अपघात आहे, आत्महत्या की घातपात, याचा उलगडा अद्याप झालेला नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, मृत्यूमागील कारण शोधण्यावर भर दिला जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी संयम बाळगण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








