
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) अर्थात अटल सेतूच्या आसपास ‘तिसरी मुंबई’ विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंबंधी राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने नुकत्याच दोन अधिसूचना काढल्या आहेत. नगरविकास खात्याने काढलेल्या पहिल्या अधिसूचनेनुसार अटल सेतुच्या आजूबाजूची गावे मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अंतर्गत असणाऱ्या ‘न्यू टाऊन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी’ला (New Town Development Authority – NTDA) विकसित करण्यासाठी हस्तांतरित करण्यात येणार आहे. सुमारे ३२३.४४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात वसलेल्या १२४ गावांच्या विकासासाठी एनटीडीएला नियुक्ती करण्याची विनंती एमएमआरडीएने २८ ऑगस्ट २०२३ रोजी राज्य सरकारला केली होती. त्यानुसार ही अधिसूचना काढण्यात आलेली आहे. यामध्ये नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रातील ८० गावे, खोपटा न्यू टाऊन अधिसूचित क्षेत्रातील ३३ गावे, मुंबई मेट्रोपोलिटन रिजनल प्लॅन मधील दोन गावे आणि रायगड प्रादेशिक आराखड्यातील नऊ गावांचा समावेश आहे.




