फलटणमध्ये सत्तासंघर्ष तीव्र : जिल्हा परिषद–पंचायत समितीत ‘राजे गट’ अस्तित्वाच्या लढाईत

0
13
फलटणमध्ये सत्तासंघर्ष तीव्र : जिल्हा परिषद–पंचायत समितीत ‘राजे गट’ अस्तित्वाच्या लढाईत

फलटण :- फलटण तालुक्यावर गेली तब्बल ३५ वर्षे एकहाती सत्ता असलेल्या राजे गटाला विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या फलटण नगरपालिका निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. या सलग दोन पराभवांनंतर आता होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजे गटाने संपूर्ण ताकद पणाला लावत ही निवडणूक अस्तित्वाची लढाई म्हणून लढण्याचा निर्धार केला आहे.
दुसरीकडे, मा. खासदार व आमदार यांच्या नेतृत्वाखाली भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून, कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्य निवडून आणणे व पंचायत समितीवर सत्ता मिळवणे हेच प्रमुख उद्दिष्ट ठेवून जोरदार रणनीती आखली जात आहे.
शिलेदारांची साथ सुटल्याने राजे गट अडचणीत
मागील विधानसभा व नगरपालिका निवडणुकीदरम्यान राजे गटाच्या अनेक प्रमुख शिलेदारांनी साथ सोडत मा. खासदार गटाची वाट धरली. त्यामुळे सध्या राजे गट काहीसा एकाकी पडलेला असून, मोठ्या नेत्यांपेक्षा मावळ्यांच्या जोरावर लढाई द्यावी लागत आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढून झालेली चूक लक्षात घेत, राजे गटाने नगरपालिका निवडणुकीत सत्तेत असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय होईपर्यंत फलटण शहरातील राजे गटाचे जवळपास सर्वच प्रमुख कार्यकर्ते मा. खासदार गटात दाखल झाले होते. परिणामी, नगरपालिकेच्या निवडणुकीत राजे गटाला उमेदवार शोधण्यापासूनच संघर्ष करावा लागला.
घरातीलच उमेदवार रणांगणात
नगराध्यक्षपदासाठी समोरून मा. खासदार यांचे बंधू मैदानात उतरल्याने, राजे गटालाही विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांना रिंगणात उतरवावे लागले. मात्र, फलटणच्या जनतेशी थेट संपर्क आणि जनाधार नसल्याने मतदारांनी त्यांना नाकारले.
संस्थात्मक बळ अजूनही जमेची बाजू
सलग दोन पराभवांनंतरही राजे गटाकडे श्रीराम व दत्त साखर कारखाने, शैक्षणिक संस्था, विविध सहकारी संस्था, गोविंद मिल्क, कमिन्स यांसारखे संस्थात्मक बळ ही मोठी जमेची बाजू मानली जात आहे. मात्र, राजकीय ताकद आणि जमिनीवरील कार्यकर्त्यांची संख्या तुलनेने कमी झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
मा. खासदार गटासमोरही आव्हाने
मा. खासदार यांच्यासोबत फलटण तालुक्यातील बहुतांश सर्व पक्षांतील दिग्गज नेते उभे असले, तरी त्यापैकी काही नेत्यांविषयी स्थानिक पातळीवर नाराजी असल्याचे चित्र आहे. ही नाराजी दूर करणे हे मा. खासदार यांच्यासमोरील मोठे आव्हान ठरणार आहे. दूधेबावी येथील सभेत त्यांनी या नाराजीची दखल घेत भाष्य केल्याने, त्यानंतर त्यांनी थेट ग्राउंड कनेक्ट सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.
३० वर्षांतील पहिलीच निवडणूक
एकूणच गेल्या ३० वर्षांत प्रथमच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रणांगणात एकही नाईक निंबाळकर थेट उमेदवार म्हणून नसणे हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरत आहे. तरीही लढत अत्यंत चुरशीची होत असून, खरा प्रचार मतदानाच्या आदल्या रात्रीच रंगणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सध्या सुरू असलेला प्रचार प्रामुख्याने आरोप-प्रत्यारोपांपुरताच मर्यादित असल्याचे चित्र आहे.