फलटण (साहस Times ) :फलटण तालुक्यातील नागरिकांना पासपोर्ट संबंधित कामांसाठी बारामती किंवा पुण्यास जावे लागते, मात्र लवकरच ही अडचण दूर होण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन फलटण शहरात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (POPSK) स्थापन करण्याची मागणी केली आहे.
खासदार मोहिते-पाटील यांच्या या पुढाकारामुळे नागरिकांना स्थानिक पातळीवरच पासपोर्ट सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पासपोर्ट सेवा केंद्रांची संख्या मर्यादित असल्याने नागरिकांना यासाठी दूर जावे लागते, मात्र फलटणमध्ये POPSK झाल्यास वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठी बचत होईल.
या मागणीला मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, प्रस्तावाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी केलेला हा महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे स्थानिक पातळीवरून स्वागत केले जात आहे.