पुणे :- आजच्या काळात मुलं-मुलींनी आपल्या पालकांशी संवाद करणं अत्यंत आवश्यक आहे, विशेषतः जेव्हा निर्णय लग्नासारख्या आयुष्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावरचा असतो. पालक आपल्या मुलांच्या भल्यासाठी निर्णय घेतात, हे खरे असले तरी, लग्नाचा निर्णय हा स्वतंत्र अस्तित्वाचा सन्मान राखून आणि स्वातंत्र्याचा विचार करून घेतला पाहिजे.
सध्याच्या पिढीचं विचारसरणी बदलली आहे. पूर्वीप्रमाणे तडजोड करून संसार चालवण्याचे दिवस संपले आहेत. आजची तरुणाई तडजोडीला पर्याय मानत नाही, ती स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाला अधिक महत्त्व देते. अनेकदा पालक आपल्या अनुभवांच्या आधारे आणि समाजाच्या नियमांच्या आधारे निर्णय घेतात. परंतु, अशा वेळी मुलांनी आपल्या भावना स्पष्टपणे पालकांना सांगणं गरजेचं आहे, जेणेकरून कोणताही दबाव न येता निर्णय घेता येईल.
मनाविरुद्ध लग्न केल्यास फक्त पती-पत्नीच नव्हे, तर दोन्ही कुटुंबीयांना भावनिक, मानसिक आणि कधी कधी आर्थिक ताण सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत संसार टिकवणं अवघड होतं. समाजाच्या अपेक्षा आणि कुटुंबीयांचा दबाव यामुळे मुलं-मुली अनेकदा अविचारी निर्णय घेतात, ज्यामुळे नंतर नात्यातील अंतर वाढतं आणि ते संबंध मोडण्यापर्यंत जातात.
‘राईट टू लव्ह’ कार्यकर्ता म्हणून मी सांगतो, प्रेम आणि लग्नासारख्या निर्णयांत दोन व्यक्तींना एकमेकांचा आदर आणि समजूत करून निर्णय घेणं आवश्यक आहे. फक्त कुटुंबाच्या दबावाखाली येऊन लग्न करण्याचा निर्णय चुकीचा ठरतो. अशा वेळी दोन्ही कुटुंबांनीही प्रेमाने आणि समजुतीने निर्णय घेतला पाहिजे.
माझी विनंती आहे की, मुलं-मुलींनी आपल्या अपेक्षा आणि विचार पालकांशी स्पष्टपणे व्यक्त करावेत. संवादातून सर्व समस्यांवर तोडगा निघतो. मात्र, संवादच नसेल, तर नातं टिकणं कठीण होतं. पालकांनी बदलत्या काळानुसार विचार करून, आपल्या मुलांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या भावनांसह मोकळं होऊ दिलं पाहिजे.
विवाहाचा निर्णय खुल्या संवादातून, प्रेमातून आणि स्वतंत्र निर्णयाचा आदर करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्यामुळे दोघांनाही समजुतीने आयुष्य जगता येईल.
– अनहद सोशल फाऊंडेशन | राईट टू लव्ह
—
—