
फलटण (दि. ३० ऑगस्ट २०२५) :फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई), जाधववाडी येथे यावर्षीच्या गणेशोत्सवाचे आकर्षण ठरले आहे उत्तर प्रदेशातील श्रीराम जन्मभूमी अयोध्या मंदिराचा देखावा.
या शाळेत दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध ऐतिहासिक वा धार्मिक स्थळांची हुबेहुब प्रतिकृती उभारण्याची परंपरा आहे. मागील वर्षी येथे मनमोहन राजवाडा (श्रीमंत नाईक निंबाळकर राजघराण्याची वास्तू) याची प्रतिकृती उभारण्यात आली होती, जी पालक व नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली होती.
यावर्षीच्या देखाव्यात नव्याने तयार झालेल्या अयोध्या मंदिराची भव्य प्रतिकृती तसेच रामलला मूर्तीचे विराजमान विशेष आकर्षण आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण देखावा टाकाऊ वस्तूंपासून कुशलतेने साकारण्यात आला आहे.
शाळेतील सेवकवर्ग, कलाशिक्षक व शिक्षकवृंद यांनी गेल्या महिनाभराच्या मेहनतीतून हा देखावा पूर्ण केला. दरम्यान, गेले दोन दिवस पालक वर्ग तसेच फलटण व जाधववाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने हा देखावा पाहण्यासाठी येत आहेत.
शाळेच्या प्राचार्या सौ. मीनल दीक्षित यांनी सांगितले की,
“गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नसून सांस्कृतिक व कलात्मकतेचा संगम असतो. त्यामुळे आमच्या शाळेत दरवर्षी अशा प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांना कला, श्रम आणि सृजनशीलतेचा धडा दिला जातो.”
गणेश भक्त व नागरिकांनी या भव्य देखाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.








