धैर्यशील मोहिते-पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशावर शिक्कामोर्तब

0
14
धैर्यशील मोहिते-पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशावर शिक्कामोर्तब

सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून अकलूजच्या मोहिते-पाटील कुटुंबाबाबत राजकीय वर्तुळात जी चर्चा सुरू होती, त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे. मोहिते-पाटील यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे समोर येत आहे. मोहिते-पाटील कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी बुधवारी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पक्ष प्रवेशाविषयी या भेटीत चर्चा करण्यात आली. अकलूजमधील विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल येथे १४ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात धैर्यशील मोहिते-पाटील यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला विजयसिंह मोहिते-पाटील आणि जयसिंह मोहिते-पाटीलही उपस्थित राहतील, अशी माहिती खा. शरद पवारांच्या भेटीनंतर मोहिते-पाटलांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

पवार यांच्या नेतृत्वाखालील  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी आपली तिसरी उमेदवार यादीत जाहीर करत सातारा आणि रावेर मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला  दहा जागा आल्या असून, पहिल्या दोन याद्यांमध्ये सात आणि बुधवारी दोन उमेदवार जाहीर करत पवारांच्या

राष्ट्रवादीने आतापर्यंत एकूण ९ उमेदवारांची घोषणा केली आहे. आता पक्षाकडून केवळ माढा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा होणे बाकी आहे. या घोषणेलाही आता अखेर मुहूर्त मिळाला असून, धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळीच त्यांच्या उमेदवारीचीही घोषणा होणार असल्याचे समजते. तसेच १६ एप्रिल रोजी खा. शरद पवारांच्या उपस्थितीतच ते माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.