
सिनेसृष्टीतल्या कामाची आवड होती म्हणून पृथ्वीराजने पुणे ते मुंबई प्रवास गाठला. मुबईतल्या फिल्मसिटीमध्ये सेटवर होणाऱ्या हालचालींना पाहण्याची उत्सुकता, तिथे होणाऱ्या तांत्रिक घडामोडी, तिथला माहोल आणि अभिनयाची आवड हे सार काही शांत बसू देत नव्हतं, याबाबत बोलताना पृथ्वीराजने सांगितलेला किस्सा ऐकून विश्वास बसणार नाही. हा किस्सा सांगताना पृथ्वीराज म्हणाला की, ‘दोन चारदा कपिल शर्मा शोला प्रेक्षक म्हणून जाण्याचा मी प्रयत्न केला. मात्र, तिथवर पोहोचवणारं माझ्या ओळखीतल कुणी नसल्यानं, मला तिथून हाकलून देण्यात आलं. शेवटी एके दिवशी पुन्हा मी तो सेट गाठला आणि सेटवर काम करणाऱ्या एका काकांना खूप लांबून हा शो बघण्यासाठी आलोय असं सांगितलं. त्यांनाही माझी दया आली असावी, तेव्हा त्यांनी मला त्या शोच्या व्यवस्थापकापर्यंत पोहोचवलं आणि त्याच्या हातापाया पडून मी तो शो लाईव्ह पाहिलाच.’






