
भारत बुध्दमय करण्याची सुरवात आपल्यापासूनच करा – भंते कश्यप
वडूज : खटाव तालुका बौध्द विकास मंडळाच्या वतीने दि. 31 मार्च 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. भारत सरकारने दि. 31 मार्च 1990 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना “भारतरत्न” पुरस्कार जाहीर केलेल्या दिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे स्वयंवर मंगल कार्यालय वडूज येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुध्द, चक्रवर्ती सम्राट अशोक आणि भारतरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करून झाले. यावेळी भंते काश्यप यांनी उपस्थितांना त्रिसरण व पंचशील दिले.यानंतर भंते काश्यप यांनी उपस्थित बौध्द बांधवांना धम्मदेसना दिली.उपस्थितांना मार्गदर्शनपर धम्मदेसना देताना भंते कश्यप म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बुध्दमय करण्याची प्रतिज्ञा केली आणि त्यांनी प्रशासकीयदृष्टया भारत बुध्दमय केला पण संपूर्ण भारत बुध्दमय करण्याची सुरवात आपल्यापासून करावी असे प्रतिपादन त्यांनी केले.
ते म्हणाले, बौद्ध धम्मात निर्वाण, परिनिर्वाण (परीनिब्बान) आणि महापरिनिर्वाण (महापरीनिब्बान) हे तीन शब्द अत्यंत मूलभूत तत्त्व समजावतात. निर्वाण म्हणजे तृष्णा (तन्हा), द्वेष (दोस) आणि मोह (मोहो) या क्लेशांचा पूर्ण नाश म्हणजे निर्वाण. थोडक्यात हे जिवंत असतानाच प्राप्त होणारे अंतिम सत्य आहे. यात व्यक्ती “अर्हंत” अवस्थेला पोहोचते. शरीर जिवंत असते, पण मन पूर्ण मुक्त झालेले असते. निर्वाण हे सर्वोच्च सुख आहे. तृष्णेचा पूर्ण त्याग म्हणजे निर्वाण.
परिनिर्वाण म्हणजे अर्हंत व्यक्तीच्या मृत्यूनंतर पंचस्कंधांचा (रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान) पूर्ण अंत होणे.अर्हंत जिवंत असताना निर्वाणात असतो. शरीर संपल्यावर पुन्हा जन्म होत नाही.
ही अवस्था “परिनिर्वाण” म्हणून ओळखली जाते. जन्म समाप्त झाला, ब्रह्मचर्य पूर्ण झाले, कर्तव्य पूर्ण झाले. आता पुनर्जन्म नाही.
महापरिनिर्वाण हे भगवान बुद्धांच्या अंतिम परिनिर्वाणाला “महापरिनिर्वाण” म्हणतात. हे एक ऐतिहासिक व आध्यात्मिक घटना आहे. गौतम बुध्द यांनी कुशीनगर येथे देह ठेवला. त्यावेळी त्यांनी अंतिम उपदेश दिला.“भिक्खूंनो, आता मी तुम्हाला सांगतो- सर्व संखार नश्वर आहेत, अप्रमादाने (सजगतेने) प्रयत्न करा.”
तीन संकल्पनांतील मुख्य फरक म्हणजे निर्वाण जिवंत असताना क्लेशांचा अंत. परिनिर्वाण हे अर्हंताच्या मृत्यूनंतर पंचस्कंधांचा अंत होतो. महापरिनिर्वाण म्हणजे बुध्दांच्या देहत्यागावेळी बुद्धांचे अंतिम निर्वाण होय
आपल्या मार्गदर्शनात त्यांनी बौद्ध धम्मातील निर्वाण, परिनिर्वाण आणि महापरिनिर्वाण या संकल्पनांचे सखोल विश्लेषण करत जीवनातील क्लेशांचा अंत करून मुक्तीच्या मार्गावर चालण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिकवणीचा स्वीकार करून भारत बुद्धमय करण्यासाठी सर्वांनी कार्यरत राहावे, असे आवाहन केले.
यानंतर प्रबुद्ध साठे यांनी “बहुजनांनो चला आपल्या बुद्धाच्या दारी” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. ते आंबेडकरवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात असून, त्यांच्या भाषणात सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि बहुजन एकजुटीवर विशेष भर देण्यात आला.
आपल्या भाषणात त्यांनी बहुजन समाजाने केवळ परंपरेपुरते मर्यादित न राहता शिक्षण, संघटन आणि संघर्षाच्या माध्यमातून प्रगती साधावी, असे त्यांनी स्पष्ट केले.विशेषतः बौद्ध धम्म स्वीकाराच्या संदर्भात मार्गदर्शन करताना त्यांनी पूर्वाश्रमीचे महार समाजातील बौद्ध बांधवांना आवाहन केले की, त्यांनी स्वतःपुरते मर्यादित न राहता इतर वंचित समाजघटकांपर्यंत धम्माचा प्रसार करावा. मातंग तसेच इतर अनुसूचित जातीतील समाजानेही बौद्ध धम्म स्वीकारून समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित जीवन जगावे, यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
तसेच त्यांनी युवकांना उद्देशून सांगितले की, शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव ठेवून अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे ही काळाची गरज आहे. संविधानिक मूल्यांचे संरक्षण आणि समाजप्रबोधन ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दोन्ही मान्यवरांचे मार्गदर्शन अत्यंत विचारप्रवर्तक ठरले. मोठ्या संख्येने उपस्थित समाज बांधवांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित नलवडे यांनी केले.आभार बबन जगताप यांनी मानले. यावेळी पं.स माण चे माजी सभापती बाळासाहेब रणपिसे, भारतीय बौध्द महासभा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, फलटण तालुक्याचे भारतीय बौध्द महासभेचे माजी अध्यक्ष तथा बौध्दाचार्य आयु.महावीर भालेराव, बी.आर जगताप, मनोहर नलावडे, शशिकांत गायकवाड, राहुल मोरे, विश्वास जगताप, सिद्धार्थ वाघमारे, उर्मिला झेंडे, अशोक बैले, सुधाकर शिलवंत व इतर मान्यवर उपस्थित होते.








