फलटण – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या सोनिया चॅरिटेबल ट्रस्टला आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. शालेय साहित्य, गणवेश, शैक्षणिक सन्मान व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन हे उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून ट्रस्टच्या माध्यमातून राबवले जात आहेत. या वर्षीच्या शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात शैलेंद्र भगवान ढावरे यांनी ट्रस्टसाठी आर्थिक मदत जाहीर केली.
या ट्रस्टच्या कार्यामागे माजी नगरसेवक सनी अहिवळे आणि अध्यक्षा सौ. सुपर्णा अहिवळे यांचे सातत्याने योगदान राहिले आहे. स्वतःच्या उत्पन्नातून अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत. मात्र, या उपक्रमांना आता मोठे स्वरूप प्राप्त झाले असल्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत ट्रस्टच्या कार्याचे विशेष गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त वॉरंट ऑफिसर जे. एस. काकडे होते. व्यासपीठावर मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य रवींद्र येवले, आरपीआयचे जेष्ठ नेते विजय येवले, माजी नगरसेवक मधुकर काकडे, विकास काकडे, सेवानिवृत्त अधिकारी सुहास अहिवळे, पत्रकार सचिन मोरे, प्राचार्य अॅड. वर्धमान अहिवळे, महेश पाटील, जय रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हरिश आप्पा काकडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सौ. सुपर्णा अहिवळे यांनी मानले. यावेळी आरपीआयचे जिल्हा सचिव विजयराव येवले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच भीम जयंती उत्सव समिती 2025 च्या कार्यकर्त्यांचाही यथोचित गौरव करण्यात आला.