सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार: मृतदेहांची अदलाबदल प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक निलंबित?

0
3
सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार: मृतदेहांची अदलाबदल प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक निलंबित?


सातारा : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला असून, मृतदेहांची अदलाबदल झाल्याच्या गंभीर प्रकारामुळे प्रशासनावर तीव्र टीका होत आहे. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांना निलंबित करण्यात आले आहे.?
वाई तालुक्यातील सोनगरवाडी येथील 26 वर्षीय आनंद ओव्हाळ आणि आरळे येथील 51 वर्षीय सुरेश खोमणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांना चेहरा न दाखवता मृतदेह सुपूर्द केल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दोन्ही मृतदेहांची अदलाबदल झाली.
यातील धक्कादायक बाब म्हणजे एका कुटुंबाने चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही उरकले. चिता पेटल्यानंतर ही गंभीर चूक लक्षात आल्याने नातेवाईकांवर पेटती चिता विझवण्याची वेळ आली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत, मृतदेह दाखवण्यास नकार दिल्यामुळेच हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे. “आम्हाला दिलेला मृतदेह आमच्या नातेवाईकाचा नव्हता. हा प्रकार अत्यंत अमानवी असून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणात पोस्टमार्टम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जबाबदार धरत त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. रजिस्टरनुसार नातेवाईकांच्या सह्या घेतल्या असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, ही घटना साताऱ्यातील सिव्हिल हॉस्पिटलमधील दुसरी घटना असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकारानंतर रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे