कराड; पुढारी वृत्तसेवा : अजित पवार यांनी बंड करून शिंदे -फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडविला. याचे पडसाद सोमवारी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कराड कर्मभूमीत उमटले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सकाळी कराड शहरात दाखल झाले आणि हजारोंच्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. आम्ही साहेबांसोबत असे फलक ठिकठिकाणी झळकले. (Sharad Pawar karad news)
अजित पवार यांच्या बंडानंतर दुसर्याच दिवशी शरद पवार सातारा दौर्यावर आले. सोमवारी सकाळी ते कराड येथील स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी आले. यावेळी कराड पाटणसह जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेर हजारोंच्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते कराडमध्ये दाखल झाले. स्व. यशवंतराव चव्हाण समाधी परिसरात कार्यकर्त्यांचा प्रचंड जोश पहायला मिळाला.
प्रचंड घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी समाधी परिसर दाणाणून सोडला. शरद पवार यांच्या पाठिंब्याचे बॅनर शहरभर झळकले. फुटून गेलेल्या आमदारांबद्दल कार्यकर्त्यांमध्ये संतापही पहायला मिळाला. आम्ही साहेबांसोबत असे पाठिंब्याचे फलक हातात घेऊन शकडे कार्यकर्ते समाधीस्थळी दाखल झाले होते.
सकाळी दहा वाजता शरद पवार समाधीस्थळी येणार होते. मात्र आठ पासूनच कार्यकर्ते जमा होवू लागले. ‘शरद पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.., देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यानंतर समाधीस्थळी झालेल्या सभेत शरद पवार यांनी जातीच्या, धर्माच्या नावाखाली जातीय तेढ निर्माण करणार्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. दरम्यान सभास्थळी मोठी गर्दी झाली होती. जिल्ह्यातील विविध भागातून कार्यकर्ते पाठिंब्यासाठी आले होते. गर्दीेवर नियंत्रण मिळविताना पोलिसांची दमछाक झाली.
पक्षाची भूमिका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केली : आ. बाळासाहेब पाटील
आ. बाळासाहेब पाटील यांनी रविवारी आपण शरद पवार यांच्यासोबत असून त्यांची भूमिका तीच आपली भूमिका असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण पक्षासह पक्ष चिन्हावर दावा केल्याकडे आ. पाटील यांचे लक्ष वेधले असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी रविवारी रात्रीच पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे, असे सांगत या विषयावर अधिक भाष्य करण्याचे टाळले. त्याचबरोबर खासदार शरद पवार यांच्यावर यापूर्वी असे अनेक प्रसंग ओढवले आहेत असे सांगत अशा कठीण प्रसंगातून पक्ष पुन्हा उभा करण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. आताच्या कठीण प्रसंगातही शरद पवार निश्चित मार्ग काढतील. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते शरद पवार यांच्या पाठीशी ठाम राहतील.
खा. शरद पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राला कोणी मार्ग दाखवू शकत नाही : पाटणकर
पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी खा. शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत. आजपर्यंत महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेवर ज्या – ज्या वेळी संकट आले आहे त्या – त्या वेळी खा. शरद पवार यांनी मार्ग दाखवला आहे. यापूर्वीही असे संकटाचे प्रसंग ओढवले होते. त्या प्रत्येक वेळी आपण आपल्या कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे होतो आणि आजही आहे. पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे लोक विरोधात गेल्याने आता जनताच त्यांचे परीक्षण करेल आणि निवडणुकीत योग्य निर्णय घेईल असेही माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी स्पष्ट केले. पाटण राष्ट्रवादी पवार यांच्या सोबत ठाम राहील, असे पाटणकर म्हणाले. (Sharad Pawar karad news)







