धम्ममित्र बालसंस्कार वर्गात काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त सतिश कांबळे यांचे मार्गदर्शन

0
3
धम्ममित्र बालसंस्कार वर्गात काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त सतिश कांबळे यांचे मार्गदर्शन

धम्ममित्र बालसंस्कार वर्गात काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त सतिश कांबळे यांचे मार्गदर्शन


फलटण : सोमवार पेठ, फलटण येथे धम्ममित्र बालसंस्कार वर्गाच्या वतीने २ मार्च ‘काळाराम मंदिर सत्याग्रह’ दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी पदाधिकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक सतीश कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
२ मार्च १९३० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काळाराम मंदिर सत्याग्रह उभारण्यात आला होता. सामाजिक समता, मानवी हक्क आणि स्वाभिमानासाठी झालेल्या या ऐतिहासिक लढ्याची माहिती सतीश कांबळे सरांनी मुलांना सोप्या भाषेत समजावून सांगितली. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य आणि शिक्षणाच्या बळावर परिवर्तन घडवण्याची प्रेरणा त्यांनी बालमित्रांना दिली.
“मुलांना शिक्षणाबरोबरच संस्कार आणि आचरणही तितकेच महत्त्वाचे आहेत,” असे प्रतिपादन करत त्यांनी चांगल्या सवयी, शिस्त, नम्रता आणि सामाजिक जाणीव यांचे महत्त्व स्पष्ट केले. लहान वयातच योग्य विचारांची पेरणी झाली तरच समाजात सुसंस्कारित पिढी घडू शकते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात सूत्र पठण व त्याचा मराठी अनुवाद याचे महत्त्वही स्पष्ट करण्यात आले. सूत्रांचे अर्थ समजून घेतल्याने केवळ पाठांतर न होता विचारांची जाण निर्माण होते, यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमास चंद्रकांत मोहिते सर उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत बालसंस्कार वर्गाच्या उपक्रमांची प्रशंसा केली. विशेष म्हणजे, एका पालकांनी आपल्या तीन वर्षांच्या मुलामध्ये बालशिबिरामुळे झालेला सकारात्मक बदल पाहून भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. “माझ्या मुलामध्ये झालेला बदल पाहून मन भरून आले,” असे त्यांनी सांगितले. या प्रतिक्रियेमुळे वर्गाच्या कार्याची परिणामकारकता अधोरेखित झाली.
धम्ममित्र बालसंस्कार वर्ग, सोमवार पेठ, फलटण येथे अशा प्रकारचे उपक्रम नियमित राबवले जात असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
यावेळी धम्ममित्र बालसंस्कार वर्गातील सर्व बालक, तरुण कार्यकर्ते, उपासक उपासिका उपस्थित होत्या.