
यंदाच्या हंगामात मराठवाड्याच्या तुलनेत उशीराने मान्सून पुण्यात दाखल झाला होता. जून महिन्याच्या अखेरचा आठवडा वगळता अद्याप पुण्यात पावसाने जोर धरला नव्हता. जुलै महिन्यातही पावसाने सरासरी गाठली नव्हती. त्यामुळं खरीप हंगामाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलेलं आहे. त्यानंतर आता पुणे शहर तसेच जिल्ह्यात येत्या आठवड्याभरात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आतापर्यंत पुण्यात केवळ हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. शिवाजीनगर, पाषाण, कोथरुड, बावधन, वडगावशेरी आणि हडपसर या भागांमध्ये अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही. तसेच जिल्ह्यातील मुळशी, आंबेगाव, बारामती, इंदापूर, शिरुर आणि शिवापूर या तालुक्यांमध्येही अपेक्षित पाऊस झालेला नाही.






