प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ल्याचा निषेध; पुण्यात संतप्त जाहीर सभा, मास्टरमाईंडवर कारवाईची मागणी”

0
2
प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ल्याचा निषेध; पुण्यात संतप्त जाहीर सभा, मास्टरमाईंडवर कारवाईची मागणी”

पुणे : ‘शिवविचार आणि बहुजन उत्थानाचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांवरच हल्ले होत असतील, तर ही सत्तेची मस्ती असून, त्याचा समाचार घेतलाच जाईल’, असा स्पष्ट इशारा सोमवारी पुण्यात भरलेल्या जाहीर सभेत देण्यात आला. ही सभा संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती.

शिवाजी व्यायाम मंदिरासमोर आयोजित सभेत संभाजी ब्रिगेडसह विविध समविचारी संघटनांनी एकत्र येत हल्ल्याचा तीव्र निषेध केला. “आमच्याच पोरांना हाताशी धरून आमच्याच कार्यकर्त्यांवर हल्ले करणाऱ्यांची मास्टरमाईंड मंडळी शोधा, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही,” असा इशारा या सभेतून देण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या जेम्स लेनपासून सुरू झालेले हे प्रकार आता सत्तेच्या पाठबळाने वाढत असल्याचा आरोप करण्यात आला. प्रविण गायकवाड हे अनेक वर्षांपासून संभाजी ब्रिगेडचे नेतृत्व करत असून, त्यांनी जात-पात न मानता बहुजन युवकांना उद्योग, शिक्षण, उद्योजकता यासाठी प्रेरित केले आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामुळेच हे हल्ले होत असल्याचा सूर यावेळी उमटला.

हल्लेखोर वेगळे असले, तरी त्यांना भडकावणाऱ्यांचा हेतू समाजात तेढ निर्माण करण्याचा असल्याचे वक्त्यांनी सांगितले. “विचारांची लढाई विचारांनीच व्हायला हवी,” असे मतही यावेळी व्यक्त झाले.

या सभेला काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप, शिवसंग्रामचे तुषार काकडे, इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे, पुरुषोत्तम खेडेकर, सत्यशोधक समाजाच्या प्रतिमा परदेशी, संभाजी ब्रिगेडचे प्रदीप कणसे, हर्षवर्धन मगदूम, शिवसेनेचे संजय मोरे, यांच्यासह अनेक सामाजिक, राजकीय व विचारवंत कार्यकर्ते उपस्थित होते.