सातारा : राज्य शासनाने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेश क्र. जिपनि-२०२५/प्र.क्र.३६/पं.रा-२ दिनांक १२ जून २०२५ अन्वये प्रभागाच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्याच्या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
या आदेशानुसार, सातारा जिल्हा परिषद आणि ११ पंचायत समित्यांची प्रारूप प्रभागरचना १४ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार असून, संबंधित तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे ती सर्वसामान्य नागरिकांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सदर प्रारूप प्रभागरचनेविषयी नागरिकांना काही हरकत, सूचना किंवा सुधारणा करावयाची असल्यास संबंधित तहसीलदार कार्यालयात दिनांक २१ जुलै २०२५ पर्यंत सकारण लेखी निवेदन सादर करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी केले आहे. त्या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती वा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.