Preparation for admission: Diploma courses after 12th प्रवेशाची तयारी : बारावीनंतर पदविका अभ्यासक्रम

0
19
Preparation for admission: Diploma courses after 12th प्रवेशाची तयारी : बारावीनंतर पदविका अभ्यासक्रम


सर्वसाधारणपणे पदविका अभ्यासक्रमासाठी दहावीनंतर प्रवेश मिळतो, मात्र असे काही पदविका कोर्सेस आहेत ज्यामध्ये फक्त बारावीनंतरच प्रवेश मिळतो आणि तोसुद्धा कोणतीही वेगळी प्रवेश परीक्षा न देता बारावीच्या बोर्डाच्या मार्कांआधारे. अशा पदविका अभ्यासक्रमांची माहिती करून घेऊया.

डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट

बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करीअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर दोन मार्ग उपलब्ध आहेत. एक म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट पदवी, ज्यासाठी बारावीनंतर देशपातळीवरील किंवा महाराष्ट्राची सीईटी परीक्षा द्यावी लागते आणि दुसरा मार्ग म्हणजे बोर्डाच्या मार्कांआधारे तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम. आर्ट्स, कॉमर्स , सायन्स किंवा व्होकेशनल यापैकी कोणत्याहीशाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या पदविका कोर्ससाठी प्रवेश मिळतो. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. या क्षेत्रात स्वयंरोजगार करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा पर्यंत शिक्षणही पुरसे ठरते.

सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी

कार, स्कूटर पासून रेफ्रीजरेटर पर्यंत कोणतीही वस्तू आकर्षक व चकचकीत करून ग्राहकांना मोहित करण्याचं काम सरफेस कोटिंग करतं. सरफेस कोटिंग चा उपयोग वस्तूंच्या पृष्ठभागाचे संरक्षण करणे , पृष्ठभाग गंजप्रतिबंधक बनवणे / उष्णता प्रतिबंधक बनवणे इ. विविध गोष्टींसाठी केला जातो. बारावीनंतर या विषयात तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त पुण्यातील डेक्कन एज्युकेशन संस्थेमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. बारावी विज्ञान शाखेतून फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथेमॅटीक्स या विषयांमध्ये किमान ३५ गुण मिळवून बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येतो. हा तीन वर्षांचा कोर्स सॅन्डविच स्वरुपाचा असून यामध्ये दुसऱ्या वर्षात चार महिने व तिसऱ्या वर्षात चार महिने इंडस्ट्री मध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यावा लागतो. या काळात इंडस्ट्री स्टायपेंडही देते. हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी इंडस्ट्रीतील अनुभवी व्यक्ती असतात आणि या कोर्स ची फी सुद्धा अत्यंत माफक आहे. थिअरी बरोबरच आठ महिन्यांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव पदरी असल्याने हा कोर्स पूर्ण केल्यानंतर नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होतात त्याचबरोबरीने विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग डिग्री च्या कोणत्याही शाखेत थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो व विद्यार्थी पुढे तीनच वर्षांत इंजिनीअरिंग डिग्री पूर्ण करतात. हा कोर्स पूर्ण करुन थोडा अनुभव गाठीशी बांधल्यावर विद्यार्थ्यांना उद्याोजकतेच्या संधीही उपलब्ध होतात. मुलींनाही या कोर्सला प्रवेश घेता येतो आणि त्याही या क्षेत्रात उत्तम करीअर करु शकतात. महाराष्ट्रातील पहिल्या औद्याोगिक पेंट बनवणाऱ्या कंपनीच्या मालक प्रतिभा भांबुरकर यांनीही याच कोर्स मधून आपले करीअर घडवले आहे.

डिप्लोमा इन फार्मसी

करोना महामारीच्या काळात जगभरात ज्या उद्याोगाची सर्वात जास्त भरभराट झाली तो उद्याोग म्हणजे फार्मसी अर्थात औषध निर्माण उद्याोग. ज्या उद्याोगात मंदी कधीच येत नाही त्या फार्मसी क्षेत्रात जाण्यासाठी बारावीनंतर दोन मार्ग उपलब्ध आहेत. एक म्हणजे फार्मसी पदवी, ज्यासाठी बारावीनंतर महाराष्ट्राची सीईटी परीक्षा द्यावी लागते आणि दुसरा मार्ग म्हणजे बोर्डाच्या मार्कांआधारे दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी बारावीच्या मार्कांच्या आधारे प्रवेश मिळतो. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना फार्मसी पदवीच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश घेता येतो. हा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वत:चे मेडिकल शॉप सुरु करता येते किंवा हॉस्पिटलच्या फार्मसी मध्ये नोकरी मिळू शकते. औषध कंपन्यांच्या मार्केटिंग व विक्री विभागातही या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळू शकतात.

बारावीनंतरच्या या तिन्ही पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया बारावीच्या निकालानंतर थोड्याच दिवसात सुरू होईल. यासाठीची जाहिरात http://www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची बारावीच्या बोर्डाच्या मार्कांआधारे मेरीट लिस्ट तयार केली जाते. व नंतर प्रवेशासाठी कॅप राऊंड होतात.

त्यानंतर विद्यार्थ्यांचे मार्क आणि त्यांनी दिलेले महाविद्यालयांचे विकल्प यांची सांगड घालून अंतिम प्रवेश निश्चित केला जातो.

vkvelankar@gmail.com



Source link