
लोणंद (ता. खंडाळा, जि. सातारा) परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कुंटणखान्यावर पोलिसांनी धडक कारवाई करून जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलल्या जात असलेल्या दोन महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई १५ सप्टेंबर रोजी करंजेपूल बसस्टॉप परिसरात करण्यात आली. यामध्ये दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडील स्विफ्ट गाडी (क्र. एम एच ११ एमडी ८०५५) जप्त करण्यात आली आहे.
वडगाव निंबाळकर पोलिस पथक पेट्रोलिंग करत असताना लाल रंगाची काळ्या काचा असलेली संशयित गाडी दिसली. पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करून गाडीची पाहणी केली असता दोन महिला आणि दोन पुरुष आढळले. महिला पोलिसांच्या उपस्थितीत चौकशी केली असता, महिलांनी आपल्याला पुण्यातील हडपसर येथून पैशाचे आमिष दाखवून आणल्याचे सांगितले. आरोपींनी त्यांना जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणी सुयोग हिंदुराव खताळ (रा. कापडगाव, लोणंद ता. फलटण, जि. सातारा) व प्रीतम आप्पासाहेब घुले (रा. कापडगाव, लोणंद ता. फलटण, जि. सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार या प्रकरणातून आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलिस निरीक्षक विलास नाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, उपनिरीक्षक राहुल साबळे, डी. एस. वारुळे, हवालदार अमोल भोसले यांच्यासह एस. पी. देशमाने, रमेश नागटिळक, कुंडलिक कडवळे, पोपट नाळे, निलेश जाधव व नागनाथ परगे यांनी विशेष परिश्रम घेतले.







