
P
फलटण : राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिकांच्या प्रभाग रचनेवर हरकती मागवल्या होत्या. यातील बहुतांश हरकती फेटाळण्यात आल्या असून प्रभाग रचनेची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.
फलटण नगरपालिकेसाठी तेरा प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. या रचनेवर तब्बल 97 हरकती दाखल झाल्या होत्या, मात्र त्या सर्व हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आता निवडणुकीसाठी प्रचाराची रणनीती आखणे शक्य होणार आहे.
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गट-गण रचनेबाबतही अनेकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता, पण न्यायालयाने अनेक निर्णय फेटाळले आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वीच नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आरक्षण कार्यक्रम जाहीर होईल, अशी माहिती मिळत आहे.
आगामी 15 ते 20 दिवसांत आरक्षणाची अंतिम घोषणा अपेक्षित असून यामुळे इच्छुकांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. परिणामी स्थानिक राजकारणात दिवाळीपूर्वीच निवडणुकीचा उत्साह ओसंडून वाहण्याची शक्यता आहे.







