
फलटण प्रतिनिधी :- फलटण नगरपरिषद निवडणुकीचा जल्लोषपूर्ण माहोल अधिक रंगतदार बनवत शिवसेना (एकनाथ शिंदे) व राजे गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार विकास वसंतराव काकडे व स्मिता शहा यांच्या प्रचार मोहिमेला आज नवीन उर्जा मिळाली. म्युनिसिपल कामगार वसाहतीतील खोडीयार माँ मंदिर येथे श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यातआला. खोडीयार माँ मंदिरा पासून काढण्यात आलेल्या या भव्य प्रचार फेरीत कार्यकर्ते, महिला वर्ग आणि तरुणाईने उत्साहाने सहभाग नोंदवला. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले सभागृहात तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून उमेदवारांनी सामाजिक न्याय आणि विकासनिष्ठ भूमिकेची घोषणा केली.
प्रचार फेरीदरम्यान नागरिकांनी मांडलेल्या स्थानिक समस्या, विकासकामांची गरज आणि सुविधा यावर उमेदवारांनी सकारात्मक संवाद साधत समाधानकारक तोडग्यांची ग्वाही दिली. उमेदवारांच्या सभोवती दिसणारा प्रचंड उत्साह आणि विविध समाजघटकांचा सहभाग पाहता निवडणुकीतील स्पर्धा अधिक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे.







