
फलटण : फलटण रेल्वे स्टेशनच्या परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलात होते . फलटण – बारामती रेल्वे मार्ग प्रकल्पाचे काम सुरू करण्याच्या स्थितीत असल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्याचे पथक पाहणी करण्यासाठी फलटण येथील रेल्वे स्टेशनवर आले होते . यावेळी मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर रामकरण यादव व रेल्वे अधिकारी व कर्मचारी रेल्वेमार्ग पाहणी दोऱ्यात उपस्थिती होते
फलटण-बारामती रेल्वेमार्गाच्या पहाणीनंतर या मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु होणार असून डिसेंबर २०२६ मध्ये काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष या मार्गावर रेल्वे धावताना दिसेल. हा प्रकल्प तब्बल २३वर्षे रखडला होता. पूर्वी या प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी मिळाली नव्हती. अंतिम मंजुरीनंतर या मार्गाचे काम सुरु होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. फलटण-पंढरपूर रेल्वेमार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला असून रेल्वे विभागाने या मार्गासाठी जमीन संपादित केली आहे. आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. केंद्र व राज्यसरकारचीही परवानगी मिळाली असून हा प्रकल्प एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा असल्याने कबीनेटच्या मंजुरीनंतर फलटण-पंढरपूर रेल्वेर्गाचेही काम मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल अशी अपेक्षा खासदार रणजितसिंह यांनी यावेळी व्यक्त केली.
देशातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा बुलेट ट्रेनचा मुंबई-हैद्राबाद प्रकल्प फलटणच्या शिंदेवाडी कॉर्नरवरून जाणार असून बुलेट ट्रेनची सुविधा माढा लोकसभा मतदार संघात खेचून आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत. बुलेट ट्रेनमुळे माझ्या मतदार संघातील जनतेला केवळ 40 मिनिटात मुंबई गाठता येईल. या सर्व रेल्वेमार्गांमुळे अनेक उद्योग या भागात निर्माण होण्यास मदत होईल. मोठ्या प्रमाणात दळण-वळण वाढेल. रोजगार उपलब्ध होऊन बेरोजगारी कमी होण्यास मदत होणार असल्याचे खासदार रणजितसिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.
रेल्वे अधिकारी रामकरण यादव म्हणाले, फलटण- बारामती रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रिया, एजन्सी प्रक्रिया व अन्य तांत्रिक बाबींची प्रक्रिया पूर्ण झाल्याने या रेल्वेमार्गाचे काम सुरु करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. प्रत्यक्ष या रेल्वेमार्गाच्या कामाचा शुभारंभ लवकरच प्रधानमंत्री यांचाहस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर या मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू होईल. फलटण- पंढरपूर रेल्वे प्रकल्प 2 हजार कोटींचा असल्याने नीती आयोगाची मंजूरी आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या दोन- तीन बैठक झाल्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प मंजूर होण्याच्या स्थितीत आहे. या पूर्वीच या रेल्वेमार्गासाठी जागा उपलब्ध करण्यात आली असून उपलब्ध जागेंवर रेल्वेचे फलक लावले आहेत. नीती आयोगाकडून क्लेरियन्स आला की या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर पंढरपूर तीर्थक्षेत्रावरून अनेक ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या ब्रॉडगेज रेल्वे गाड्या यांच्यामधून प्रवाशांना व भाविकांना प्रवास करणे सुखकर होणार आहे. माळशिरस तालुक्यातून सदरच्या रेल्वे मार्ग जात असल्याने माळशिरस तालुक्याच्या आर्थिक सुबत्तेमध्ये वाढ होणार आहे. रेल्वे मार्गामुळे व्यापार पेठ, शिक्षण, शेतीमाल विक्रीसाठी फायदा होणार आहे. अशा अनेक गोष्टींचा फायदा माळशिरस तालुक्याला होत असल्याने निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी प्रचाराच्या वेळी सिंचन रेल्वे, रस्ते असे अनेक विकासकामे व जनहिताच्या निर्णयाचे भाषणामध्ये सांगून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड मताने विजयी करा, असे आवाहन केलेले होते.
पंतप्रधान व तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या आव्हानाला साथ देत माळशिरस तालुक्याने एक लाखापेक्षा जास्त लीड दिलेले होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग, श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग, निरा-देवधर रखडलेला प्रकल्प, फलटण-पंढरपूर रेल्वे असे अनेक प्रश्न निकाली काढलेले असल्याने खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना दिलेले मत खऱ्या अर्थाने उपयोगी आले असल्याची भावना माळशिरस तालुक्यातील मतदारांमधून बोलली जात आहे.
तब्बल 23 वर्षे रखडलेला फलटण- बारामती रेल्वेमार्ग आगामी काही दिवसात पूर्ण झालेला पाहायला मिळणार असून लवकरच फलटण- पंढरपूर रेल्वेमार्ग सुद्धा माढा लोकसभा मतदार संघातील जनतेला पाहायला मिळणार असल्याचे सांगत दक्षिणेमधून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमधून या भागातील प्रवाशांना फलटण-दिल्ली असा रेल्वे प्रवास करता येणे शक्य होणार असल्याची माहिती माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद करताना दिली.







