
नानासो मोहिते यांचा मनमानी कारभार?
आयु. महावीर भालेराव यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ फलटण तालुका कार्यकारिणीचा सामूहिक राजीनामा
फलटण (प्रतिनिधी): भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आयु. महावीर भालेराव यांच्या निलंबनाच्या निर्णयाविरोधात फलटण तालुका कार्यकारिणीने सामूहिक राजीनामा देत जिल्हा नेतृत्वाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. जिल्हा पूर्व चे अध्यक्ष आयु. नानासो मोहिते यांनी केलेली कारवाई ही वैयक्तिक द्वेषातून व मनमानी पद्धतीने पूर्वग्रह दूषित असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
गेल्या वीस वर्षांपासून तन-मन-धनाने संघटनेसाठी कार्यरत असलेल्या आयु. महावीर भालेराव यांना कोणतीही पूर्वसूचना न देता निलंबित करण्यात आले आहे. निर्णय घेण्यापूर्वी त्यांची बाजू ऐकून घेणे अपेक्षित असताना जाणीवपूर्वक संवाद टाळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे निलंबनाचे पत्र येण्यापूर्वीच भालेराव यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करून भविष्यात अशी चूक होणार नसल्याचे स्पष्ट केले होते, असेही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
भालेराव यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी स्वतःला संघटनेचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून कोणतेही मत मांडले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. किंवा त्यांनी आंबेडकर समाजाला उद्देशून आव्हान केले नव्हते.तसेच कोणत्याही विशिष्ट पक्षाच्या प्रचाराचे आवाहन केले नसल्याचा दावा ही करण्यात आला आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्यात आवश्यक तो समन्वय न झाल्यानेच गैरसमज निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष या नात्याने नानासो मोहिते यांनी दोन्ही संघटनांमध्ये अधिकृत बैठक घेणे अपेक्षित होते. ते न करता कारवाई करण्यात आली, हा गंभीर प्रश्न असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
फलटण तालुक्यात ‘BSI मिशन-25’ अंतर्गत इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक सक्रिय कामगिरी झाल्याचा दावा कार्यकारिणीने केला आहे. अशा परिस्थितीत अध्यक्षांवरच कारवाई करणे हे अन्यायकारक असल्याचा सूर व्यक्त झाला.
पिंपरद (ता. फलटण) येथे फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव यांना कोणतीही पूर्वसूचना न देता सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष नानासो मोहिते यांनी ग्राम शाखा स्थापन केली. त्या शाखेच्या उद्घाटनाला ते स्वतः व इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्या ग्रामशाखेतील पदाधिकाऱ्यांनी उघडपणे भाजप सारख्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने दुहेरी निकष लावले जात असल्याची टीका करण्यात आली आहे.
तसेच खंडाळा तालुक्याचे अध्यक्ष आयु. यशवंत खुंटे यांच्या राजकीय पार्श्वभूमीचा उल्लेख करत, त्यांच्यावरील कथित राजकीय सहभागाबाबत केलेली कारवाई योग्य असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र दोन्हीही अध्यक्षांवरील कारवाईची पार्श्वभूमी वेगळी आहे. असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
१२ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्वच्या पदाधिकाऱ्यांची आभासी बैठकीत बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी भालेराव यांना प्रत्यक्ष बोलावून समज देण्याचा पर्याय सुचवला होता. त्यावर एकमत ही झाले होते. मात्र, त्या मतांना धुडकावून जिल्हा अध्यक्षांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. वरिष्ठ पातळीवर चुकीची माहिती देऊन निलंबनाची कारवाई रेटून नेल्याचा गंभीर आरोपही कार्यकारिणीने केला आहे.
या पार्श्वभूमीवर फलटण तालुका कार्यकारिणीने सामूहिक राजीनामा जाहीर करत निर्णयाचा निषेध नोंदवला आहे. नानासो मोहिते स्वतः हॉटेल व्यवसायिक असून असल्याने धम्माच्या कामाला हवा तेवढा वेळ ते देऊ शकत नाहीत. तालुका व जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या बैठका सोडून ते इतर कार्यक्रमांमध्ये दिसत नाहीत.
राज्याने व केंद्राने या गोष्टीची तातडीने दखल घेऊन भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्व च्या कार्यक्रमांना वेळ देणारा व सर्वांना घेऊन नेतृत्व करणारा जिल्हाध्यक्ष निवडावा. यासंबंधी राज्य व केंद्रीय नेतृत्वाने तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा सातारा जिल्हा पूर्वचे धार्मिक व सामाजिक काम ठप्प होईल असे तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
राजीनामा देणाऱ्यांमध्ये फलटण तालुका शाखेचे सरचिटणीस बाबासाहेब जगताप सर , कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर, प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, संस्कार सचिव बजरंग गायकवाड, संघटक विनोद भोसले, प्रशांत सोनवणे, विशाल काकडे, अतुल मोरे, संरक्षण विभाग शुभम अहिवळे, प्रचार पर्यटन सचिव राजेंद्र गायकवाड, हिशोब तपासणीस सतीश कांबळे, प्रचार व पर्यटन सचिव अमोल भोसले, संरक्षण सचिव चंद्रशेखर मोरे या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.








