पुणे:राईट टू लव्ह’चा ‘मुक्तरंग’ सन्मान! के अभिजित हे ‘राईट टू लव्ह’च्या अंतर्गत आंतरजातीय, आंतरधर्मीय प्रेमविवाह, समलैंगिक विवाह, आपले हक्क अधिकारांबद्दल जागृती करतात. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्यप्रदेश सारख्या राज्यातून देखील फोन आले आहेत. प्रसंगी त्यांना हवी ती मदत करून, सुरक्षितरित्या त्यांचा कायदेशीर विवाह देखील लावला आहे. प्रेम आणि एकतेचा संदेश देणाऱ्या अभिजित यांना मुक्ताई प्रतिष्ठानतर्फे नुकताच ‘मुक्तरंग पुरस्कार-2024’ जाहीर झाला. त्यांच्या या कामाबद्दल जाणून घेण्याचा हा प्रयत्न…
प्रेमासारखी गोड, स्वच्छ आणि सुंदर दुसरी कोणतीही भावना नाही. परंतु याबद्दल अनेक मतमतांतरे आणि विवाद असली तरी या सर्व गोष्टींवर प्रेम नेहमीच वरचढ ठरल्याचे उदाहरणे आपल्यासमोर आहेत. दररोजचे ऐकले जाणारे शब्द म्हणजे प्रेमात कोणतीही जात नसते किंबहुना कोणताही धर्म नसतो. प्रेमविवाह तसेच आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांसाठी कायदेशीर मदत, मानसिक आधार आणि कौटुंबिक समज यासह प्रेमाच्या हक्कासाठी लढणारे क्वचितच व्यक्ती आपणाला आजूबाजूला दिसतात. त्यापैकी एक म्हणजे पुण्यातील ‘राईट टू लव्ह’ चळवळीचे संस्थापक के. अभिजित. प्रेम आणि एकतेचा संदेश देणाऱ्या अभिजित यांना मुक्ताई प्रतिष्ठानतर्फे नुकताच ‘मुक्तरंग पुरस्कार-2024’ जाहीर झाला. त्यांच्या या कामाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न…
जेव्हा कोणी प्रेमात पडतो तेव्हा जात, धर्म, गरिबी किंवा श्रीमंतीचा विचार केला जात नाही. इतर नैसर्गिक भावनांप्रमाणेच प्रेमही मनाचा ताबा घेते. कोणीही जबरदस्ती करत नाही. शरीराला अन्न, पाणी, वस्त्र आणि निवारा हवा असतो. तितकीच प्रेमाची गरज असते. कोणतीही व्यक्ती प्रेमाशिवाय राहू शकत नाही. पण हे प्रेम काही ठराविक लोकांनी जाती-धर्माच्या बंधनात अडकवले आहे. घरातून, समाजापासून विरोध सुरू होतो आणि प्रेमाची परीक्षा सुरू होते. याचे अनेक उदाहरणे आहेत.
‘राईट टू लव्ह’ चळवळीचे संस्थापक के. अभिजित सांगतात, ‘‘कॉलेजमध्ये असताना ॲड. वर्षा देशपांडे यांचं ‘प्रेम आणि आकर्षण’ या विषयावर व्यख्यान ठेवलं होतं. मॅडमने त्या वेळी आम्हाला बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या. प्रेम आणि लग्नाबाबत असलेले कायदे समजले. तेव्हापासून निश्चय केला की, आपण प्रेम केलं तर, घाबरायचं काहीच कारण नाही, कारण आपण कोणती चूक करत नसतो. सत्रानंतर मनात असंख्य प्रश्न घेऊन पुण्यात आलो. एकमेकांवर अतोनात प्रेम करणाऱ्या जोडप्यांसाठी काहीतरी करायला हवं. असं सतत मनाला टोचत होतं. जीवापाड प्रेम करणाऱ्या मित्र-मैत्रिणींना मदत करायची. कोणतीही कसलीही लागेल ती मदत करायची ठरवलं.’’
के. अभिजित यांनी 2012 साली फेसबुकच्या माध्यमातून प्रेम आणि आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह या विषयावर प्रबोधन करण्याच्या दृष्टीने आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह चळवळ नावाचा ग्रुप सुरू केला. त्या माध्यमातून जनजागृती करण्यास सुरुवात केली. ती आजही सुरू आहे. ‘2014 मध्ये एका जोडप्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ प्रसारित झाला होता. तो व्हिडीओ बघून अस्वस्थ झाल्याचं के. अभिजित सांगतात. या घटनाविरुद्ध ‘संस्कृती रक्षणाच्या नावाखाली मारहाण करणाऱ्यांचा निषेध, अशी अभिजित यांनी फेसबुकवर पोस्ट केली. काही मित्रांशी चर्चा करून त्यांनी मोर्चा काढण्याचं ठरवलं. 22 जानेवारी 2015 रोजी शे-सव्वाशे तरुण तरुणींना घेऊन फर्ग्युसन रोडवर ‘राईट टू लव्ह’ या बॅनरखाली निषेध मोर्चा काढला. हातात लाल रंगाचे बदामाचे फुगे, बॅनर, भारतीय संविधानातील अधिकारांना अधोरेखित करून, घोषणा देत, हा मोर्चा निघाला. मोर्चानंतर अभिजित आणि त्याच्या मित्रांनी ‘प्रेम’ या थीमवर काम करायचं ठरवलं.
के अभिजित हे ‘राईट टू लव्ह’च्या अंतर्गत आंतरजातीय, आंतरधर्मीय प्रेमविवाह, समलैंगिक विवाह, आपले हक्क अधिकारांबद्दल जागृती करतात. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्यप्रदेश सारख्या राज्यातून देखील फोन आले आहेत. प्रसंगी त्यांना हवी ती मदत करून, सुरक्षितरित्या त्यांचा कायदेशीर विवाह देखील लावला आहे. या नऊ वर्षात दोनशेच्या जवळपास आंतरजातीय आंतरधर्मीय प्रेमविवाह लावून दिले आहेत. दोन बालविवाह थांबवण्याचं काम देखील केलं. राईट टू लव्हचं काम वाढवण्यासाठी त्यांनी “अनहद सोशल फाऊंडेशनची स्थापन केली आहे. या संस्थेच्या अंतर्गत त्यांचं काम सुरु आहे.
काय करते ‘राईट टू लव्ह’?
प्रेम करणाऱ्या जोडप्यांना प्रेमात येणाऱ्या अडचणींसाठी समुपदेशन, मार्गदर्शन करतं.
जोडप्यांना सुरक्षितता, सहायता आणि आर्थिक मदत मिळवून देणं.
विशेष विवाह कायद्यानुसार, जोडप्यांचे समुपदेशन करणे. त्यांना विवाह नोंदणी करून देण्यासाठी मदत करणं.
एलजीबीटीक्यूआई समुदायातील व्यक्तींना सर्वोतोपरी मदत करणं.
एकतर्फी प्रेमातून होणारे अत्याचार, गुन्ह्याबाबत जनजागृती करणं.
विवाह करणाऱ्या इच्छुक तरुण-तरुणी व पालकासांठी विवाह विषयांवर संवादशाळा घेणं.
विशेष विवाह कायदा याचे महत्व तसेच जनजागृती करणं.
ओनर किलिंग सारख्या घटना रोखण्यासाठी प्रबोधन करणं, चर्चासत्र भरवणं.
आंतरजातीय, आंतर धर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या दोन्ही कुटुंबाचा समेट घडवून आणणं.
आंतरजातीत, आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना कायदेशीर मदत मिळवून देणं.
प्रेम करण्याचा, जोडीदार निवडीच्या अधिकारासाठी प्रबोधन, जनजागृती करणं.
जबरदस्तीने होणारे विवाह आणि ऑनर किलिंगसारखे प्रकार थांबवण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत समन्वय करून काम करणं.
जबरदस्तीने, फसवणूक करून धर्मांतर करून होणारे विवाह रोखण्यासाठी प्रबोधन, जनजागृती करणं.
नातेसंबंध आणि समानता या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम भरवणं.
बालविवाह रोखणे, याबाबत जनजागृती करणं.
लग्नाळू तरुण-तरुणी व पालकांसाठी विवाह विषयांवर संवादशाळा घेणं.
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासकीय अनुदान मिळवून देणं.
विधवा पुनर्विवाह करणे, त्यांचे समुपदेशन करणे. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणं.
बलात्कारित, पीडित तसेच विकलांग मुली व महिलांना न्याय मिळवून देणं व पुनर्वसन करणं.





