
फलटण | प्रतिनिधी फलटण शहरातील मंगळवार पेठ प्रभाग क्रमांक दोन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळांचे व्यापक सुशोभीकरण करण्यास लवकरच सुरुवात करण्यात येणार असून, भीम जयंतीपूर्वी सर्व कामांचे पूर्णत्व साधून देण्याचे ठाम आश्वासन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले आहे.
फलटण जयंती मंडळ व विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने मुख्याधिकारी निखिल जाधव तसेच नवनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर निवेदन सादर करण्यात आले होते. या निवेदनाची तात्काळ दखल घेत, शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय अभ्यासिका आणि बुद्ध विहार या तीन अत्यंत महत्त्वाच्या स्थळांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुशोभीकरणात समाविष्ट असलेली प्रमुख कामे :
सर्व इमारतींचे सर्वांगीण रंगकाम
बांधकामातील दारांची दुरुस्ती व डागडुजी काढणे
स्लायडिंग व्यवस्था व आधुनिक लाईट फिटिंग
पंखे बसविणे
पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायरची स्थापना
वाचनालय अभ्यासिकेतील झिरपा (गळती) पूर्णतः बंद करणे
विद्यार्थ्यांसाठी जलशुद्धिकरणाची स्वतंत्र व्यवस्था
खुर्ची व टेबलांची सोय
स्मृती भवन व बुद्ध विहारास आकर्षक रंगीत प्रकाश सजावट
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी जयंती मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधत, भीम जयंतीपूर्वी सर्व कामे पूर्ण करून ही स्थळे नागरिकांसाठी अधिक सुविधायुक्त आणि प्रेरणादायी बनविण्याचा निर्धार व्यक्त केला.
या वेळी नगरसेवक सचिन अहिवळे, सुदाम आप्पा मांढरे, किरण राऊत, राहुल भैया निंबाळकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते रणजीत बाबा भोसले, अमोल सस्ते, संजय गायकवाड उपस्थित होते. तसेच आदर्श अहिवळे, सुजल गायकवाड, निसर्ग सावंत, स्वप्निल काकडे, अनिकेत अहिवळे, संघराज अहिवळे, अमर अहिवळे, शशी अहिवळे, प्रणव काकडे, संविधान काकडे, प्रेम अहिवळे, रोनित अहिवळे, साहिल अहिवळे आदी कार्यकर्त्यांनी निवेदन देताना उपस्थिती लावली.
या निर्णयामुळे फलटण शहरातील आंबेडकरी चळवळीशी निगडित स्थळांना नवसंजीवनी मिळणार असून, विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.








