maratha reservation : कराडात महामोर्चाद्वारे मराठ्यांचे वादळ | पुढारी

0
18









कराड, पुढारी वृत्तसेवा : ओबीसीमधून राज्यातील मराठा समाजबांधवांना सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देत राज्य शासनासह सर्वपक्षीय नेत्यांना जाग आणण्यासाठी सोमवारी कराड येथे तालुक्यातील मराठा समाजबांधवांनी महामोर्चा काढला. या महामोर्चात सुमारे 22 ते 23 हजार मराठा बांधवांनी सहभागी होत राज्यकर्त्यांसह राजकीय नेत्यांविरोधात असंतोष व्यक्त केला. मनोज जरांगे- पाटील यांची प्रकृती ढासळल्यास शासनच जबाबदार असून भविष्यात तीव्र आंदोलन करू, असा सज्जड इशाराच यावेळी मराठा बांधवांनी दिला आहे.

कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून सोमवार, 30 रोजी सकाळी 10 वाजता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसह मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कराड येथे महामोर्चाचे आयोजन केले होते. या महामोर्चासाठी दोन ते तीन दिवसांपासून विविध पातळीवर जनजागृती केली जात होती. सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून कराडमधील शिवतिर्थ (दत्त चौक) परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यानजीक मराठा समाज बांधव एकत्र येऊ लागले होते. सकाळी 11 वाजेपर्यंतच्या दोन तासात या परिसरात अक्षरशः पाय ठेवण्यास जागा नव्हती.

तालुक्याच्या विविध भागातून येणार्‍या मराठा बांधवांच्या वाहनांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली होती. या ठिकाणाहून मराठा बांधव शिवतिर्थ परिसरात चालत येत असल्याने बहुतांश मार्गावर जणू भगवे वादळ अवतल्याचा भास होत होता.

दुपारी पावणेबाराच्या सुमारास मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा शिवतिर्थ येथून मुख्य बाजारपेठेतून आझाद चौक, चावडी चौक, कन्याशाळा, जोतिबा मंदिर, बुधवार पेठेतून मुख्य पोस्ट ऑफिसपासून तहसील कार्यालयावर आला. मोर्चावेळी सहभागी मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात होती. मरठा आरक्षणाच्या मागणीसाठीचे फलकही सहभागी युवकांनी हातात घेतले होते. प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसिलदार विजय पवार यांना निवेदन दिल्यानंतर राष्ट्रगिताने महामोर्चाची सांगता झाली.











Source link