
‘यातल्या एका कलाकाराला बँकेचे हफ्ते भरायला पैसे नसताना अनेकदा आर्थिक मदत करूनही पैसे परत मिळवताना या कलाकाराने माझ्या तोंडचं पाणी पळवले होते. वर ‘इतकं काय पैशासाठी मागे लागलात, तुम्हाला काय कमी आहे?’ अमुक एक तारखेला पैसे परत देतो, असा शब्द देऊनही अनेक वेळा ते पैसे वेळेवर परत न करणाऱ्या कलाकाराला वेळोवेळी पार्ट्या करायला, बाहेर फिरायला जायला पैसे असायचे. एका अभिनेत्रीने तर माझ्या एका तंत्रज्ञानाला मिळालेला आणि चांगला व्ह्यू असलेला फ्लॅट, तिचा लकी नंबर असल्याचं सांगून तो फ्लॅट तिला मिळवून देण्यासाठी मला विनंती केली. मी सांगितल्यामुळे आणि मीच फ्लॅट मिळवून दिला असल्यामुळे माझ्या एका शब्दावर त्याने स्वतःचा फ्लॅट त्या अभिनेत्रीला ट्रान्स्फर केला आणि तिचा फ्लॅट त्याने घेतला. ही अभिनेत्री तिला लकी नंबर असलेल्या फ्लॅटमध्ये कधीच रहायला आली नाहीच. तिच्या वेगवेगळ्या कलाकार मित्रांबरोबर फक्त क्षणभर विश्रांतीसाठीच तिथे यायची. पाच वर्षांनी तिथे तो फ्लॅट विकला, तेंव्हा चांगला व्हू असल्यामुळे तिला त्या फ्लॅटचे ज्यादा पैसे मिळाले. करोडो रुपये मिळूनही या कृतघ्न अभिनेत्रीच्या मनात साधा विचारही आला नाही की, ज्या व्यक्तीने त्याचा फ्लॅट आपल्याला ट्रान्स्फर केला, त्या तंत्रज्ञाला माणुसकी म्हणून काहीतरी द्यावे. फोन करून मी तिला झापल्यावर तिच्या नशिबात होता म्हणूनच तिला तो फ्लॅट मिळाल्याचे तिने उत्तर दिले आणि ‘तुमची एवढीच इच्छा असेल मी त्याला काही द्यावे, तर मी त्याला चांदीचे एक निरांजन गिफ्ट देते’ असं ती बोलल्यावर तिच्यात किती दानत आहे, याचा मला अंदाज आला. याच अभिनेत्रीनेनंतर एका मोठ्या हुद्द्यावर असलेल्या पैसेवाल्या अधिकाऱ्याबरोबर लग्न केले. काही महिन्यांपूर्वी एका टीव्ही चॅनेलवर ही अभिनेत्री तिच्या नवऱ्याबरोबर समाजकारणात येणार असल्याचे कळवळून सांगत होती. तो तिचा अभिनय पाहून मी थक्क झालो. अभिनेता मिलिंद गवळीसारखे केलेल्या मदतीची जाणीव ठेवणारे काही कलाकार आहेत म्हणून काही कलाकारांमध्ये माणुसकी आहे, याची प्रचिती येते.’








