
महात्मा ज्योतीराव फुले : बहुजनांच्या मुक्तीचा २०० वर्षांचा प्रवास
महात्मा ज्योतीराव फुले : बहुजनांच्या मुक्तीचा २०० वर्षांचा प्रवास
भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात महात्मा ज्योतिराव फुले यांचे स्थान अत्यंत अग्रगण्य आहे. ११ एप्रिल १८२७ रोजी जन्मलेल्या या महान विचारवंताच्या कार्याला ११ एप्रिल २०२७ रोजी २०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे ११ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२७ हा कालावधी त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरा करणे ही समाजासाठी एक मोठी प्रेरणादायी संधी आहे.
महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते एक क्रांतिकारक विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि शेतकरीहिताचे पुरस्कर्ते होते. त्यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, जातिभेद आणि अन्याय यांच्या विरोधात निर्भीडपणे लढा दिला. त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू मानवतेचा आणि समतेचा पुरस्कार हा होता.
शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी अभूतपूर्व कार्य केले. त्यांनी १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांची मोठी साथ लाभली. सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घालून महिलांना सशक्त बनवण्याचा मार्ग मोकळा केला.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी १८८२ मध्ये हंटर कमिशनसमोर (शिक्षण आयोग) साक्ष देऊन प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावे, अशी आग्रही मागणी केली. त्यांनी उच्चवर्गीयांचे शिक्षण न झिरपता, बहुजन, स्त्रिया व शोषित वर्गाच्या शिक्षणावर भर देण्याचे, तसेच शिक्षणाचे मराठीकरण करण्याची ऐतिहासिक शिफारस केली.
फुलेंनी उच्च शिक्षणापेक्षा प्राथमिक शिक्षणासाठी सरकारी निधी खर्च करावा, असे स्पष्ट मत मांडले. त्यांनी ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी शिक्षण सक्तीचे व मोफत असावे, अशी शिफारस केली. ग्रामीण भागातील शेतकरी आणि मागासवर्गीयांच्या शिक्षणासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावेत, असे त्यांनी सुचवले. स्त्री शिक्षणावर विशेष भर देत, महिला शिक्षिकांची नियुक्ती करण्याची मागणी केली. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून (मराठी) असावे, तसेच शिक्षकांसाठी ग्रामीण भागात योग्य प्रशिक्षण व पगार असावा, अशी त्यांनी ब्रिटिश सरकारकडे मागणी केली.
महात्मा जोतिराव फुले यांनी स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यता निवारणाचे कार्य सुरू केल्यावर सनातनी लोकांनी त्यांना मारण्यासाठी धोंडीराम नामदेव कुंभार आणि रामोशी जातीचे रोढे हे दोन मारेकरी पाठवले होते. मात्र, फुलेंच्या निर्भय आणि प्रेमळ स्वभावामुळे या मारेकऱ्यांचे हृदयपरिवर्तन झाले. पुढे हेच मारेकरी फुलेंचे अनुयायी बनून त्यांच्या सामाजिक कार्यात मदत करू लागले.
महात्मा जोतिबा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. समाजातील शोषित, दलित, बहुजन आणि महिलांना अन्यायातून मुक्त करणे, जातीय भेदभावाचे निर्मूलन करणे आणि शिक्षण-समानतेचा प्रसार करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. या समाजाचे पहिले अध्यक्ष व खजिनदार महात्मा फुले स्वतः होते.
महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या समस्या अधोरेखित करत त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. त्यांच्या “शेतकऱ्याचा आसूड” या ग्रंथातून त्यांनी शेतकऱ्यांची दुर्दशा आणि सत्ताधाऱ्यांची बेफिकिरी यावर कठोर टीका केली. तसेच त्यांनी धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या शोषणाला विरोध करून सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना केली, ज्याचा उद्देश समाजात समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करणे हा होता.
जातिव्यवस्था आणि पुरोहितशाहीविरोधात त्यांनी ठाम भूमिका घेतली. त्यांनी माणसाच्या जन्मावर नव्हे, तर त्याच्या कर्तृत्वावर त्याचे मूल्य ठरावे, हा विचार मांडला. त्यांच्या कार्यामुळे समाजात परिवर्तनाची नवी लाट निर्माण झाली.
महात्मा जोतीराव फुले हे एक द्रष्टे आणि यशस्वी उद्योजकही होते. त्यांनी कंत्राटदार म्हणून खडकवासला धरण, कात्रजचा तलाव आणि पुण्याच्या अनेक ऐतिहासिक इमारतींच्या उभारणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी ‘पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी’ (Pune Commercial & Contracting Company) च्या माध्यमातून व्यवसाय केला. व्यवसायातून मिळवलेला नफा त्यांनी स्वतःच्या चैनीसाठी न वापरता बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आणि समाजकार्यासाठी खर्च केला.
१८८९ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील नाभिक समाजाला संघटित करून विधवांच्या केशवपनाविरुद्ध एक ऐतिहासिक आणि यशस्वी ‘नाभिक संप’ घडवून आणला होता. या सामाजिक आंदोलनाद्वारे ब्राह्मण विधवांचे केशवपन थांबवून त्यांना सन्मान मिळवून देणे हा मुख्य उद्देश होता. विधवा महिलांचे केस कापून त्यांना विद्रूप करण्याच्या अनिष्ट प्रथेला विरोध करणे हा या संपाचा हेतू होता. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी नाभिक बांधवांचे प्रबोधन करून या अन्यायी प्रथेविरुद्ध एकत्र आणले.
हा संप केवळ एक आंदोलन नव्हता, तर सामाजिक समता आणि स्त्रीसन्मान प्रस्थापित करण्यासाठी उचललेले एक मोठे पाऊल होते. अमेरिकेतील स्त्रीवादी चळवळींकडून त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली. त्यांनी तार पाठवून जोतिबांचे अभिनंदन केले.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक विचारांवर आधारित ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्याचा आसूड’ – जातीव्यवस्थेवर आणि गुलामगिरीवर कडक प्रहार करणारे ग्रंथ, जे त्यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केले. ‘सार्वजनिक सत्यधर्म’, ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘इशारा’ आणि ‘सत्सार’ यांसारखी क्रांतीकारक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी ‘अखंड’, ‘छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा’ (१८६९), ‘मराठी ग्रंथागार सभेस पत्र’ (१८८५), ‘सत्यशोधक समाजाचा पूजेचा विधी’ या लेखनाच्या माध्यमातून स्त्री शिक्षण, सामाजिक समानता व शूद्रातिशूद्रांच्या हक्कांसाठी लढा उभारला. त्यांच्या याच विचार व कार्याचा आदर्श घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानले.
आज त्यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या विचारांचे स्मरण करून ते आचरणात आणणे गरजेचे आहे. शिक्षण, समानता, स्त्रीसक्षमीकरण आणि सामाजिक न्याय या मूल्यांची जोपासना करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. महात्मा फुले यांचे जीवन आपल्याला शिकवते की समाज बदलायचा असेल तर विचार बदलावे लागतात आणि त्यासाठी धैर्य, चिकाटी व निःस्वार्थ भाव आवश्यक असतो. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपण एक समताधिष्ठित आणि प्रगत समाज घडवू शकतो.
आयु. सोमीनाथ पोपट घोरपडे, सामाजिक कार्यकर्ता
संस्कार सचिव, भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व)
मोबाईल नं. ९२८४६५८६९०








