
Mahashivrastri Upvas: महाशिवरात्री जवळ आली की अनेक भक्त उपवास करतात. आपल्या संस्कृतीत उपवासाला आध्यात्मिक शुद्धीचे स्थान दिले गेले आहे. देवपूजा, जप आणि संयम यांसोबत शरीरालाही विश्रांती देण्याचा हा एक मार्ग मानला जातो. अनेक लोक केवळ धार्मिक कारणांसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही उपवास पाळतात. योग्य पद्धतीने उपवास केल्यास शरीर स्वस्थ होते, पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. पण दिवसभर काही न खाल्ल्यानंतर उपवास सोडताना जर चुकीची पद्धत अवलंबली, तर उलट त्रास वाढू शकतो. म्हणून उपवास जितका महत्त्वाचा, तितकेच त्याचे पारण कसे करावे हे जाणून घेणेही आवश्यक आहे.
उपवासानंतर लगेच तिखट-तेलकट खाणे टाळा
दिवसभर पोट रिकामे असल्यामुळे पचनसंस्था संवेदनशील बनते. अशावेळी लगेच तळलेले, मसालेदार किंवा जास्त तेलकट पदार्थ खाल्ले तर ऍसिडिटी, अपचन आणि पोटदुखीची समस्या होऊ शकते. त्यामुळे उपवास संपल्यावर हलक्या आहाराने सुरुवात करणे योग्य ठरते.
आंबट फळे खाण्याची घाई करू नका
रिकाम्या पोटी आंबट फळे खाल्ल्यास पोटातील आम्ल वाढते. त्यामुळे जळजळ, गॅस आणि पचन बिघडण्याची शक्यता असते. म्हणून पारण करताना सुरुवातीलाच संत्री, मोसंबी किंवा इतर आंबट पदार्थ खाणे टाळावे.
ज्यांना डायबेटिज आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय उपवास करू नये. दीर्घकाळ अन्न न घेतल्यावर अचानक जास्त खाल्ल्यास ब्लड शुगर लेव्हल अस्थिर होऊ शकते. यामुळे चक्कर, अशक्तपणा किंवा इतर त्रास संभवतात.
अनेकांना उपवासानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. मात्र रिकाम्या पोटी कॅफिन घेतल्यास ऍसिडिटी वाढू शकते आणि मेटाबॉलिज्मवर परिणाम होतो. त्यामुळे पारण करताना प्रथम सौम्य पेय घेणे अधिक सुरक्षित ठरते.
उपवास सोडताना सर्वात आधी करा ‘हे’ काम
दिवसभर उपवासामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते. त्यामुळे सर्वप्रथम 1 मोठा ग्लास पाणी प्यावे. त्यानंतर दही, ताजे फळांचा ज्यूस, नारळ पाणी किंवा लिंबू सरबत घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळते.
उपवासानंतर शरीराला ताकद देणारा आहार आवश्यक असतो. त्यामुळे कडधान्य, उकडलेल्या भाज्या, हलकी खिचडी किंवा साधे घरगुती अन्न खाणे फायदेशीर ठरते. थोड्या प्रमाणात खाण्यापासून सुरुवात करून नंतर नियमित आहार घ्यावा.
हे ही वाचा: Bel Patra Ayurvedic Use: पुजेत अर्पण होणारे बेलपत्र ‘या’ आजारांवर रामबाण उपाय
योग्य पद्धतीने पारण केल्यास उपवासाचे खरे फायदे मिळतात. पचन व्यवस्थित राहते, थकवा कमी होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे महाशिवरात्रीसह कोणताही उपवास करताना केवळ श्रद्धाच नव्हे तर योग्य आहारशिस्त पाळणेही तितकेच आवश्यक आहे.







