
फलटण : लोकसभा निवडणूक 2024 मधील माढा लोकसभा (43) मतदारसंघ अंतर्गत फलटण-कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती फलटण विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
फलटण विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 35 हजार 999 मतदार असून यामध्ये 1 लाख 63 हजार 939 स्त्रिया, 1 लाख 72 हजार 46 पुरुष, आणि इतर 14 मतदारांचा समावेश आहे. या विधानसभा मतदारसंघात 341 मतदान केंद्र असून प्रत्येक मतदान केंद्रावर 1 मतदान केंद्राध्यक्ष, 4 मतदान अधिकारी, 1 मतदान कर्मचारी नियुक्त केले असून प्रत्येक मतदान केंद्रावर 1 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघात समावेश असणाऱ्या फलटण विधानसभा मतदारसंघात एकूण 2625 अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीतील फलटण विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवरील नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळी 9 वाजता येथील अधिकारगृह समोरील असणाऱ्या शासकीय धान्य गोदामातील निवडणूक मुख्य केंद्रात उभारण्यात आलेल्या 17 टेबलवरुन साहित्याचे वाटप करण्यात आले. मतदान प्रक्रियेचे साहित्य संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या ताब्यात दिल्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांना 51 एसटी बस व 3 जीप या वाहनांमधून 341 मतदान केंद्रावर पाठवण्यात आले.
फलटण विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांची स्वच्छता करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या असून मतदान केंद्रावरील नियुक्ती अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी चहा, नाष्टा, जेवणाची व्यवस्था स्थानिक बचत गटांच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
येथील मध्यवर्ती निवडणूक कक्षामध्ये मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटमधील तांत्रिक बाबींसाठी 13 तज्ञ व्यक्तींचा समावेश असणाऱ्या पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. मतदानाच्यादिवशी दर 2 तासांनी मतदानाची आकडेवारी संकलित करण्यासाठी स्वतंत्र 2 पथकांची नेमणूक करण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मतदारसंघातील 341 मतदान केंद्रांवरील मतदानाचेसाहित्य जमा करून घेण्यासाठी एकूण 23 टेबल उभारण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्यात आली असून अधिकारगृह परिसर व शासकीय धान्य गोदाम परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला असल्याचे फलटण विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले आहे.








