
S Jaishankar in London: केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सध्या ब्रिटन दौऱ्यावर असून, काही औपचारिक भेटीगाठी आणि बैठकांमध्ये ते सहभागी होताना दिसत आहेत. पण, हा दौरा त्यांना समाधानकारक अनुभव देऊन गेला असं नाही. एका कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमस्थळाहून निघत असतानाच जयशंकर यांना अनपेक्षित विरोधाचा सामना करावा लागला.
सोशल मीडियावर या क्षणी नेमकं काय घडलं यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिथं सुरक्षा रक्षकांच्या गराड्यातच जयशंकर आपल्या वाहनात बसताना दिसत आहेत. त्यांच्या वाहनापासून काही अंतर दूरवर सामान्य नागरिकांना प्रवेश निषिद्ध असून, तिथंही पोलीस यंत्रणा तैनात केल्याचं दिसून येतं. लंडन इथं घडलेल्या या घटनेमध्ये सुरक्षा यंत्रणांना न जुमानता एक खलिस्तान समर्थक व्यक्ती अचानकच जयशंकर यांच्या वाहनासमोर धाव घेतो. हाती तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज घेऊन कारसमोर येताच ही व्यक्ती त्याचा अपमान करताना दिसत आहे.
तिरंग्याचा अवमान केल्याप्रकरणी तातडीनं स्थानिक पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं. पण, या विरोधप्रदर्शनानं आणि त्याच्या भारतविरोधी घोषणाबाजीनं सध्या अनेकांचं लक्ष वेधलं. एस जयशंकर हे 4 ते 9 मार्चदरम्यान ब्रिटनच्या अधिकृत दौऱ्यावर गेले असून, यादरम्यान ते ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेविड लॅमी आणि इतरही अधिकाऱ्यांची भेट घेतील असं सांगण्यात येत आहे. भारत आणि ब्रिटनमधील राजकीय नातेसंबंध आणखी दृढ करण्यच्या हेतूनं त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
सदर दौऱ्यात जयशंकर व्यापार, आरोग्य, शिक्षण, संरक्षण सहकार्य आणि दोन देशांतील संबंध या मुद्द्यांवर चर्चा करताना दिसतील. ब्रिटनमागोमाग ते 6 ते 7 मार्चदरम्यान आयर्लंड इथं जाणार असून, तिथं ते सायमन हॅरिस यांची भेट घेणार असून तिथं ते भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
काश्मीर मुद्द्यावर जयशंकर यांची कोणती भूमिका?
लंडनमधील चॅथम हाउस थिंक टँक नावाच्या एका कार्यक्रमात सहाभागी झालं असता जयशंकर यांनी तिथं ‘भारताचा उदय आणि जागतिक स्तरावर देशाची भूमिका’ या मुद्द्यावर चर्चात्मक संवादात सहभाग घेतला. यादरम्यान त्यांनी काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवला जाण्यापासून आर्थिक सुधारणा आणि मतदानाच्या टक्केवारीत वाढ अशा मुद्द्यांवर आपले विचार मांडले. काश्मीरमधील बहुतांश समस्यांवर भाररातील केंद्र सरकारनं तोडगा मिळवला असून, अनुच्छेद 370 हटवणं हे त्यातील पहिलं पाऊल होतं, ज्यानंतर येथील आर्थिक आणि सामाजिक विकासाकडे लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचं त्यांनी या कार्यक्रमादरम्यान सांगितलं. याच कार्यक्रमातून बाहर पडल्यानंतर मात्र जयशंकर यांना एका अनपेक्षित प्रसंगाचा सामना करावा लागला.







