
फलटण | महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना जर लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही; तर विद्यमान खासदारांना सुद्धा उमेदवारी तिकीट मिळू देणार नाही; असे स्पष्ट मत विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले
कोळकी येथील आनंद मंगल कार्यालयामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे निंबाळकर बोलत होते. यावेळी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी अजित पवार गट) चे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती मोठ्या संख्येने होते.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना जर उमेदवारी देण्यात आली नाही; तर आगामी काळामध्ये विद्यमान खासदारांना सुद्धा उमेदवारी मिळवून देण्यासाठी जे काही करावे लागेल ते मी करणार आहे चुकून झालेल्या खासदाराची किंमत संपूर्ण मतदारसंघ मोजत आहे; असे मत यावेळी श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.
मी जलसंपदा मंत्री होतो, त्यावेळी जलसंपदा खात्याला पुरेसा निधी द्यायला हवा होता, परंतु जलसंपदा खात्याला तसा निधी दिला गेला नाही, जर पंधरा-वीस टक्के निधी या खात्याला दिला असता तर मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रावर दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली नसती, त्यावेळी कर्नाटक आंध्रप्रदेशने लवादाप्रमाणे पाण्याचे वाटप करून घेतलं होतं, कृष्णा महामंडळ स्थापन झाल्यानंतर माझ्या डोक्यात हे पक्क गणित बसलं होतं की, आपल्याला ३१ मे २००० पूर्वी धरणं सुरू करायची व शक्य झालं तर त्या धरणात पाणी साठवन सुरू करायची आणि फक्त धोम बलकवडी धरणच नव्हे तर सातारा जिल्ह्यातील तारळी, उरमोडी, बलकवडी, निरादेवघर, गुंजवणी तसेच पुणे व कोल्हापूर मधील काही धरणे या सर्व धरणासाठी त्यावेळी प्रयत्न केले नसते तर आज ही धरणे अस्तित्वात आली नसती असे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
कृष्ण खोऱ्याला निधी मिळत नव्हता त्यावेळी आम्ही कर्जरोख्यातून निधी उभा केला, कर्जरोख्यातून १७०० कोटी रुपये उभे केले आणि त्यावेळेस या धरणांच्या प्रशासकीय मान्यता घेण्यात आली टेंडर काढण्यात आली, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी या दुर्गम भागात पायी घरोघरी फिरलो आहे, त्यावेळी अभयसिंहराजे, विक्रमसिंह पाटणकर व आनंतराव थिटे यांची देखील भरपूर मदत झाली आहे
आहे मात्र हे सर्व खासदाराना माहित नाही त्यांना फक्त आत्ता धरणांना मिळालेल्या वाढीव मान्यता व भूमिपूजन माहित आहेत असा टोला श्रीमंत रामराजे यांनी लगावला.
जिल्ह्यातील पाणी अडवून बरेचश्या प्रकल्पाचा पाया मी घातलेला आहे धोम बलकवडी आणि नीरा देवघर चे पाणी मीच आणले असून खासदार म्हणून यांनी काहीच काम केलेले नाही. आम्ही आमदार म्हणून केलेल्या कामांवर हे दोघे नागोबा आयत्या पिठावर रेगोट्या ओढण्याचे काम करत आहे. खासदार झाल्यापासून काय काम केले, आमदार करतात ती कामे करून त्याचे श्रेय घेत आहेत, हा त्यांनी रेल्वे आणली हे मान्य करू, मात्र तुमची रेल्वे रिकामी फिरते त्याला आम्ही काय करायचे असा मिश्किल सवाल श्रीमंत रामराजे यांनी केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण येथे झालेल्या सभेत फडणवीस माझ्याकडे आल्यामुळे खासदार म्हणाले की आम्ही कडू गोळी गिळली आहे, पण तुमचे तोंडच कडवट आहे तुमच्या जिभेतून चांगले काहीच आलेले मी बघितलेच नाही अशी टीकाही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
कर्नाटक, आंध्रला जे पाणी जाणार होते, त्यातले पाणी बारामतीने नेले, तर यांच्या पोटात का दुखते? असा सवाल रामराजे यांनी या वेळी केला. खासदार झाल्यावर त्यांनी पहिला जीआर काढला. नीरा-देवघरचे पाणी हे वीर धरणातून फक्त नीरा-देवघरच्या लाभक्षेत्रात द्या; परंतु आपण मोर्चा काढल्यामुळे ते थांबले. नीरा-देवघरच्या लाभक्षेत्रात हे पाणी दिल गेलं असतं, तर नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या फलटण तालुक्यातील ३६ गावांना हे पाणी मिळाले असते का? एवढे या पाणीदार खासदारांना पाण्यातले कळते, अशी टीकाही रामराजे यांनी केली. यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की; आज बोलवलेल्या सभेमध्ये जर उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्यासह विविध मान्यवरांचे जर फोटो वापरले असते; तर माझ्यासह तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बोलताना बऱ्याच अडचणी आल्या असत्या त्यामुळे आ कोणाचेही फोटो वापरले नाहीत.
सर्वसामान्य नागरिकांची काम मार्गी लावायची व त्या कामांचे कुठेही बोभाटा करायचे नाही; हे संस्कार आमच्या घराचे आहेत. आमच्या आजोबांपासून आम्ही केलेल्या कामांचे प्रदर्शन आम्ही कधीही केले नाही; आमच्या तालुक्यातील आमचे कार्यकर्ते हे अतिशय सरळ मार्गे असून त्यांना कोणाचेही अध्यात मध्यात जायची सवय नाही. विरोधातील असलेले काही ठराविक चमचे फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत असतात; त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही; असेही यावेळी श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.
फलटण संस्थांचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांनी लवकरात लवकर राजकारणात यावे. श्रीमंत रामराजे व श्रीमंत संजिवराजे यांचे हात बळकट करण्यासाठी राजे कुटुंबीयांमधील युवा पिढीने सुद्धा पुढे येणे गरजेचे आहे. श्रीमंत संजीवराजे यांना दिल्लीला पाठवण्यासाठी श्रीमंत अनिकेतराजे यांनी फलटण मध्ये येऊन कामकाज करायला सुरुवात करावी व सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी त्यांनी त्यांचे नंबर जाहीर करावेत; असे मत यावेळी खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती रमेश धायगुडे यांनी व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीमध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी आपण सर्वांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपण महायुतीत गेल्याने आपल्या तालुक्यामध्ये रखडलेली विकासकामे पुन्हा सुरू झालेली आहेत. कृष्णा खोऱ्याची स्थापना ही वास्तविक श्रीमंत रामराजे यांच्यामुळेच झालेली आहे. श्रीमंत रामराजे यांच्यामुळेच धोम – बलकवडी प्रकल्प पूर्णत्वास गेलेला आहे; असे मत यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी व्यक्त केले.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तालुक्यातील विविध संस्था या ऊर्जेत अवस्थेत आणण्याचे काम केलेले आहे. या सर्व कष्टाला तडा जायचं काम आता होत आहे. माढा लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यानंतर पवार साहेबांना प्रचंड मताधिक्याने आपण सर्वांनी विजयी केले आहे. मागच्यावेळी माळशिरस तालुक्यातील हा अपघात केलेला आहे. तो आगामी काळामध्ये बदलण्याचे काम आपण करू व हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाला पाहिजे; यासाठी आपण प्रयत्नशील राहो असे मत यावेळी श्रीमंत संजीवराजे व्यक्त केले.








