फलटण (साहस Times ) :- फलटण मलटण येथील पांडुरंग कुंभार हे दुचाकीवरून जात असताना, नायरा पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या मानेला चायना मांजाचा गंभीर फटका बसला. या दुर्घटनेत त्यांचा गळा खोलवर कापल्याने त्यांना तात्काळ फलटण येथील स्वामी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
स्वामी हॉस्पिटलचे सर्जन डॉ. रविंद्र बिचकुले यांनी अतिशय तत्परतेने उपचार केले. त्यांच्या मानेला तब्बल १८ टाके टाकावे लागले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
चायना मांजाविरोधात अनेक वेळा जनजागृती मोहीम राबवली जाते. तसेच, त्याचा वापर व विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. तरीदेखील, अशा घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत.
पोलिसांच्या भरारी पथकाद्वारे काही कारवाई होते खरी, पण संपूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही, ही खेदजनक बाब आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चायना मांजाचा वापर फक्त माणसांच्या नव्हे, तर पक्ष्यांच्याही जीवाला धोका निर्माण करत आहे. पतंग उडवणं आनंददायी असलं, तरी प्राणघातक मांजा वापरणं समाजासाठी संकट बनत आहे.
सामान्य नागरिकांकडून एकच मागणी —
“पतंग उडवा, पण चायना मांजाचा वापर करू नका!”