मुनगंटीवार म्हणाले की, या चार तालुक्यांना निसर्ग व ऐतिहासिक स्थळांचा मोठा वारसा आहे. या चारही तालुक्यात पर्यटनाकरीता मोठ्या संख्येने पर्यटक विविध पर्यटन स्थळांना तसेच गड किल्ल्यांना भेटी देत असतात. जुन्नर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेला किल्ले शिवनेरी, अष्टविनायक गणपतीची लेण्याद्री, ओझर ही धार्मिक स्थळे आणि माळशेज घाट, नाणेघाट, किल्ले जिवधन, किल्ले चावंड ही प्रामुख्याने पर्यटकांची आवडती स्थळे आहेत. राज्य शासनानेही जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणुन घोषित केलेला आहे. या बिबट सफारीने येथील पर्यटनाला अधिक चालना मिळेल आणि रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.






