
Konkan Rain update : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. कोकणात पावसाचा जोर सर्वाधिक आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील नद्यांना पुर आला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलंडली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर गावाला पाण्याने वेढले आले. या गावातील घरात पाणी घुसले असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. एनडीआरएफच्या पथकाद्वारे बचाव कार्य राबवले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावात देखील पुरस्थिती असून अनेक घरात पुराचे पाणी घरात गेले आहे. तर मुंबई गोवा महामार्गावर देखील पाणी साठले आहे. रविवारी आणि सोमवारी सकाळपासून कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. पुरातील पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्याचा वेग वाढवण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढणार असल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.







